रत्नागिरी : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार पायाभूत वर्गासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) मैत्री बालमनाशी ही हस्तपुस्तिका दोन भागात तयार करण्यात आली आहे. तीन ते सहा वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अंगणवाडी सेविका ब बालवाडी शिक्षिका यांच्यासाठी ही हस्तपुस्तिका मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहे.
शालेय शिक्षणाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ३ ते ८ या वयोगटाला पायाभूत शिक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२२ विकसित करण्यात आला आहे. त्यात ३ ते ६ वयोगटातील वर्षनिहाय बालबाटिका १, २ आणि ३ असे टप्पे करण्यात आले आहेत.
या स्तरावरील पाठ्यपुस्तकाऐवजी विद्यार्थ्यांसाठी कृतिपत्रिका, शिक्षकांसाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका उपलब्ध करण्याची तरतूद आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार एससीईआरटीने तयार केलेल्या आधारशिला बालवाटिका १, २ व ३ या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी यंदापासून सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आधारशिला अभ्यासक्रम २०२४ वर आधारीत मैत्री बालमनाची मार्गदर्शक हस्तपुस्तिका भाग १ व २ प्रामुख्याने विकसित करण्यात आल्या आहेत.
हस्तपुस्तिकेची वैशिष्ट्ये
भाग १ मध्ये बालशिक्षणातील मूलभूत तत्त्वे, वर्ग व्यवस्थापन, सर्वसमावेशक शिक्षण, विद्यार्थ्यांची दैनंदिनी दिनचर्या यांचा समावेश आहे. यामध्ये ९ शैक्षणिक संकल्पनावर आधारित वेळापत्रकाची रचना करण्यात आली आहे. अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, क्षमताविकास, अध्ययन निष्पत्ती आणि बालकांसाठी आनंददायी शिकण्याचे वातावरण यावर भर दिला आहे. गाणी, गोष्टी आणि खेळाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात आले आहे. भाग २ मध्ये बालवाटिका १ ते ३ या वयोगटनिहाय टप्प्यांसाठी १८१ कृतींचे संकलन करण्यात आले आहे. या कृती बालभारतीच्या कृतिपत्रिकांशी सुसंगत आहेत. त्यामुळे अध्यापन अधिक समृद्ध होते. ही दोन्ही हस्तपुस्तके एससीईआरटीच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 02/Aug/2025














