राजापूर : श्री लक्ष्मी मंदिरात चोरट्यांनी चोरल्या दीडशे वर्षापूर्वीच्या १० ते १२ घंटा

राजापूर : गेले काही दिवस तालुक्यात चोऱ्यांचे प्रकार वाढत असतानाच आता चोरट्यांनी मंदिरांकडे आपला मोर्चा वळविला आहे. तालुक्याच्या करक येथील श्री लक्ष्मी मंदिरातील १० ते १२ घंटा शुक्रवारी रात्री चोरीला गेल्याची घटना घडली आणि परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, रायपाटण पोलिस दूरक्षेत्रच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

करक येथील श्री लक्ष्मी मंदिर हे अर्जुना धरणाच्या पुनर्वसन वस्ती पासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर डोंगराळ परिसरामध्ये आहे. या मंदिरात सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीच्या जुन्या घंटा होत्या. शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्या मंदिरामध्ये प्रवेश करून तेथील सुमारे दहा ते बारा घंटा चोरल्याची घटना घडली. ही बाब सकाळी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या लक्षात आली. ज्यावेळी भाविक मंदिरात गेले त्यावेळी तेथील घंटा ह्या जागेवर नव्हत्या.

मंदिरातील घंटा चोरीला गेल्याचे निदर्शनाला येतात गावचे पोलिस पाटील महेंद्र जाधव यांनी तत्काळ रायपाटण पोलिस दूरक्षेत्रचे हेड कॉन्स्टेबल कमलाकर पाटील यांना मोबाईल वरून संपर्क साधून झाल्या घटनेची माहिती दिली. त्या नंतर रायपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि झालेल्या चोरीची पाहणी केली. या चोरी प्रकरणी लक्ष्मी रवळनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनंत गंगाराम ऐनारकर यांनी रायपाटण पोलिस दूरक्षेत्र कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 04/Aug/2025

Radhakrushna patapedhi