रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावची ग्रामदेवता दुर्गादेवी तळेकरीण मातेच्या मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासातील कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. आज (ता. ४) सकाळी १० वाजता सापड कार्यक्रम होईल. या वेळी सर्व ग्रामस्थ मिळून मंदिर परिसराची स्वच्छता करतील. एकदिवसीय हरी नाम गजर म्हणजे एक्का येत्या ५ व ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.
मंगळवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजता देवीची रूपे लावणे व गावातील पुरोहित यांचेकडून विधिवत पूजा होऊन कार्यक्रमाला सुरुवात होईल. आरतीने कार्यक्रम सुरू होईल. यानंतर दुपारी १ वाजल्यापासून गावातील वाड्यांतील भजन मंडळाचे भजन होईल. दुपारी १ ते ३ यावेळेत तिसंगकरी ग्रामस्थ मंडळाचे भजन होईल. यानंतर ३ ते ६ सुतारवाडी, ६ ते ९ डावलवाडी, गुरव निवईवाडी ९ ते १२ याप्रमाणे भजने होतील. रात्री १२ ते १ आरती व यानंतर पुन्हा क्रमाने सकाळी ११ वाजेपर्यंत भजने होतील.
बुधवारी (ता. ६) रोजी सकाळी ११ वाजता सांगता कार्यक्रम सुरू होईल. रिमझिम पावसात देवनामाचा गजर करत पालखीसह सर्व ग्रामस्थ व भक्तगण देवळाभोवती पाच प्रदक्षिणा घालतील. त्यात भक्तगण तल्लीन होऊन नाचतील. यात आबालवृद्धांसह महिलाही सहभागी होतील. यानंतर सर्व मानकरी, खुमदार व भक्तगण यांच्या उपस्थितीत विसर्जन कार्यक्रम होईल. ७ ऑगस्टला जागर होईल. या दिवशी देवीचे पोवते का वाटपाचा कार्यक्रम होईल. ११ ऑगस्टला देव भैरी मंदिरात अभिषेक होईल. कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन खोत मंडळी, खुमदार व गावकरी मंडळींनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 04/Aug/2025














