रत्नागिरी, १८ ऑगस्ट:
शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साचलेले पाणी काढणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना आज उद्यमनगर परिसरात घडली. घरासमोर साचलेले पाणी पंपाने बाहेर काढत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने मिथुन चंद खेत्री (वय ३४) या भंगार व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे उद्यमनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक माहितीनुसार, मिथुन खेत्री हे आपल्या कामगारांसह भंगार गोळा करण्याचे काम करून रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उद्यमनगर येथील आपल्या घरी परतले. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घरासमोर पाणी साचले होते. हे पाणी बाहेर काढण्यासाठी त्यांनी पाण्याचा पंप लावण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी आपला भाऊ अमण्णा याला पंप सुरू करण्यास सांगितले आणि स्वतः पंपाजवळ उभे राहिले. पंप सुरू झाल्यानंतर, पंपाच्या पाईपला असलेला फुटवॉल दाबण्यासाठी मिथुन यांनी पाण्यात हात घातला असता, त्यांना विजेचा एक तीव्र झटका बसला. या धक्क्याने ते जागीच फेकले जाऊन बेशुद्ध पडले.
हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने एका खाजगी वाहनाने चिंतामणी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची (AM No. 83/2025) नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. ऐन तारुण्यात एका होतकरू तरुणाचा मृत्यू झाल्याने खेत्री कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 18-08-2025














