रत्नागिरीकर चिंब भिजले ‘श्रावणधारे’त; बहारदार काव्यमैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी, १८ ऑगस्ट:
श्रावणातील रिमझिमत्या सरींप्रमाणेच उत्तमोत्तम कवितांचा वर्षाव अनुभवण्याची संधी रत्नागिरीतील काव्यरसिकांना मिळाली. संकल्प कलामंच आणि कोकण मराठी साहित्य परिषद (को म सा प) युवाशक्ती दक्षिण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘श्रावणधारा काव्यमैफिल’ नुकतीच उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराज पूजनाने झाली. यानंतर सहभागी कवींच्या बहारदार सादरीकरणाने सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले. श्रावण आणि पावसाळ्यावर आधारित कवितांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. या स्पर्धेत ज्येष्ठ लेखिका सुनेत्रा जोशी यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेत सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांनी आपल्या अप्रतिम काव्य सादरीकरणाने प्रथम क्रमांक पटकावला. अर्चना देवधर यांनी द्वितीय, तर वृषाली टाकळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. इतर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी को म सा प युवाशक्ती दक्षिण विभाग प्रमुख श्री. अरुण मौर्य यांनी मनोगत व्यक्त केले आणि संकल्प कलामंचचे अध्यक्ष श्री. विनयराज उपरकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी को म सा प युवाशक्ती रत्नागिरी शाखा प्रमुख गुरुदेव नांदगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी संकल्प कलामंचचे आण्णा वायंगणकर यांनी स्वतःची एक सुंदर कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली आणि सर्वांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:35 18-08-2025