कोल्हापूर, १८ ऑगस्ट : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई यांच्या हस्ते काल उद्घाटन झाल्यानंतर आजपासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. या ऐतिहासिक दिवशी खंडपीठासमोर पहिल्याच प्रकरणात युक्तिवाद करण्याचा बहुमान रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध वकील ॲड. राकेश भाटकर यांना मिळाला.
या ऐतिहासिक दिवसासाठी प्रशासकीय न्यायमूर्ती मा. न्या. मकरंद कर्णिक आणि मा. न्या. शर्मिला देशमुख यांचे प्रथम खंडपीठ न्यायालय म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासमोर ॲड. भाटकर यांचे प्रकरण पहिल्या क्रमांकावर पटलावर आले. या प्रकरणात रत्नागिरीतील रहिवासी श्री. जय कदम यांनी कोल्हापूर येथील पोलीस अधिकाऱ्यांविरोधात आपल्या क्रेनची अनधिकृत विक्री करणे आणि मुलाला पोलीस मारहाण करणे याविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या गंभीर प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या महत्त्वाच्या प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाधिवक्ता ॲड. बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर, न्यायालयाने सरकारला या प्रकरणी दोन आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
कोल्हापूर येथे हे सर्किट बेंच सुरू झाल्यामुळे आता कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा ऐतिहासिक दिवशी, पहिल्याच खटल्याचा युक्तिवाद रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र ॲड. राकेश भाटकर यांनी यशस्वीपणे केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.











