रत्नागिरीत मुसळधार! नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरू असून हवामान विभागाने कोकण विभागाला रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आज मंगळवारी (दि.१९) सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात असून अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोपडून काढले आहे. मागील तीन-चार दिवस सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यात पावस जोरदार कोसळत आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेड-दापोली मार्गावर सातत्याने पाणी येत असल्याने, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेतही सलग दोन दिवस पाणी घुसल्याने व्यापार्‍यांसह ग्रामस्थांचे नुकसान झाले. चिपळूण बाजारपेठेमध्येही रविवारी पाणी घुसले होते. नागरिकांना सातत्याने सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत होत्या. मोठ्याप्रमाणात पडणार्‍या पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ होत आहे. नदया नाल्यांना पूर स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागामध्येही डोंगराळ भागात रस्त्यांवर माती येण्याचे प्रकार घडत असून, स्थानिक ग्रामपंचायत व बांधकाम विभागाकडून रस्ते मोकळे केले जात आहेत. सखल भागात नद्यानाल्यांचे पाणी घुसण्याची शक्यताही प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 19-08-2025