रत्नागिरी : जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांसाठी ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर

रत्नागिरी : हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील ३२ हजार ४४९ शेतकरी फळ पीक विम्याच्या परताव्यासाठी पात्र ठरले आहेत. परतावा जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर परताव्याची रक्कम कधी जमा होणार, याबाबत मात्र प्रतीक्षा आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना शासनाने जाहीर केली असून आंबा, काजू पिकाचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. परतावा जाहीर करण्यासही उशीर झाला आहे.

आंबा ६९ टक्के
जिल्ह्यातील सहभागी ३० हजार ४ आंबा बागायदारांपैकी २६ हजार ९६९ शेतकरी पात्र ठरले असून ७० कोटी चार लाख २३ हजार ७०८ रुपये परतावा रक्कम जाहीर झाली आहे. टक्केवारी ६९.०६ टक्के आहे.

काजू १२६ टक्के
काजूसाठी प्रथमच भरघोस परतावा जाहीर झाला आहे. सहभागी ६,८१४ शेतकऱ्यांपैकी ५,४८० शेतकरी पात्र ठरले. आठ कोटी ८० लाख ९५ हजार ८८२ रुपये परतावा रक्कम असून टक्केवारी १२६ टक्के आहे.

परताव्यात घट
गतवर्षीच्या तुलनेत पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी परताव्याची रक्कम घटली आहे- ७,८३६ लाभार्थी वाढले; परंतु तुलनेने दोन कोटी ३९ लाख ८,४४४ रुपये परतावा रक्कम कमी झाली आहे.

एकूण शेतकरी – ३६,८१८
एकूण क्षेत्र (हे.) – २०,६९४.७१
विमा संरक्षित रक्कम – २,७२८,०६०,४४४

शेतकरी प्रतीक्षेत
हवामानातील बदलामुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी फळपीक विमा योजनेत सहभागी होतात. परतावा जाहीर करण्यासाठी विलंब झाला, शासनाकडून विमा हप्त्याचे पैसे जमा झाल्यानंतरच प्रत्यक्ष पैसे मिळणार आहेत.

हवामानातील बदलाचा पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. काही महसूल मंडळांतील ट्रिगर अॅक्टिव्हेट होत नसल्यामुळे बागायतदारांचे नुकसान होते. यावर उपाययोजना व्हावी. – राजन कदम, बागायतदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:16 21-09-2024