रत्नागिरी : भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान

रत्नागिरी : यावर्षीपासून प्रथमच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाला आहे. भजनी मंडळांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाने पाच कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्यानुसार पात्र भजनी मंडळाच्या खात्यात २५ हजार रुपये जमा होणार आहेत.

काय आहे सरकारची घोषणा
सण, उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक, धार्मिक जागर करणाऱ्या मंडळाला राज्य शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. राज्य शासनाकडून थेट आर्थिक सहाय्य मंडळांना मिळणार आहे.

नोंदणीकृत व प्रमाणित भजनी मंडळांना ५ कोटी
शासनाकडून भजनी मंडळांसाठी पाच कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. भजनी मंडळाचा अर्ज पात्र झाल्यास मंडळाच्या बँक खात्यावर २५ हजार रुपये जमा होणार आहेत.

अनुदान मिळवण्यासाठी पात्रता अशी
मंडळाने यापूर्वी शासनाकडे कोणत्याही समान योजनेसाठी अर्ज केलेला नसावा. भजनी मंडळाचे नोंदणीकृत अस्तित्व असणे आवश्यक आहे. गावपातळीवर नियमित सांस्कृतिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे.

ऑनलाइन अर्ज कुठे करावा?
शासनाच्या www.mahaanudan.org. या संकेतस्थळावर अर्ज करावा.

आवश्यक कागदपत्रे
भजनी मंडळ अनुदान अर्ज सुरू झाले असून, अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत दाखला, कार्यक्रमाचे फोटो, झालेल्या कार्यक्रमाच्या आयोजकाचे पत्र, कार्यक्रमासंदर्भातील वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या कात्रणाची छायांकित प्रत, निमंत्रण पत्रिका, जाहिरातीचे कात्रण जोडणे क्रमप्राप्त आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 25/Aug/2025