Bhaskar jadhav| गावचा रखवालदार जागरूकच हवा : आमदार भास्कर जाधव

चिपळूण : शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी शाखाप्रमुखांच्या उपस्थितीवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचा रखवालदार हा त्या गावाचा शाखाप्रमुख असतो. गावचा शाखाप्रमुख जागरूक असताना गावात काहीही चुकीचे होऊ शकत नाही, गावाचा रखवालदार जागरूक नाही तर पक्षाचे रक्षण कोण करेल, असे म्हणत आमदार जाधव यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

येथील बांदल हायस्कूलच्या सभागृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आमदार जाधव म्हणाले, गावागावात शाखाप्रमुख सतर्क आहे, जागरूक आहे, तो अभ्यासू आहे, निर्भय आहे आणि तो निर्भीड आहे. त्या गावांमध्ये सहजासहजी कोणाला शिरकाव करता येत नाही. म्हणूनच पहिल्यांदा माझ्या मतदारसंघाची उजळणी केली. एक महत्त्वाची बैठक बोलावली आणि मी सांगितलं की फक्त शाखाप्रमुखांनी या. जसे की आज सांगितले आहे, फक्त शाखाप्रमुखांनी या असे मी म्हटले होते आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघांमधील आलेले शाखाप्रमुख आणि त्यांची उपस्थिती पाहिल्यानंतर मला अतिशय काळजी वाटली, ही वस्तुस्थिती चिंताजनक आहे. विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख उपस्थित राहतात. संघटक, समन्वयक, सर्वजण हजर राहतात. मात्र, शाखाप्रमुख हजर राहत नाहीत. त्या गावाचा रखवालदारच आमचा जागेवर नाही. त्या गावाचा आमचा रखवालदार जागरूक नाही. त्या मतदारसंघात माझ्या पक्षाचे रक्षण कोण करेल ?

ठाकरे शिवसेनेपुढे आव्हान
गावागावांतील शाखाप्रमुख सतर्क आणि जागरूक राहावा, यासाठी आयोजित चिपळूणधील मेळाव्यात ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चिंताजनक आहे. आगामी निवडणुकीत आव्हान राखण्यासाठी तळातील फळी मजबूत करण्याची आवश्यकता या मेळाव्याच्या निमित्ताने चर्चेत आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 26/Aug/2025