रत्नागिरी : भारतीय टपाल तिकिटांच्या संग्राहकांसाठी घोषित करण्यात आलेल्या दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या ९ सप्टेंबरपर्यंत आहे.
भारतीय टपाल विभागातर्फे आयोजित फिलाटेली (पोस्टाची तिकिटे जमविण्याचा) छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजना” सुरू करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोस्टाच्या तिकीट संग्रहामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी ही सात वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. फिलाटेली हा छंद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर 40 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ही योजना ही सहावी ते नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. शिष्यवृत्तीची रक्कम वार्षिक 6 हजार रुपये (500 महिना) मिळेल. विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत शिकणारा असावा त्याचबरोबर अलीकडच्या वार्षिक परीक्षेत त्याने कमीत कमी 60 टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी किंवा ग्रेड पॉइंट असणे बंधनकारक आहे. मागासवर्गीयांसाठी ही टक्केवारी ५० टक्के आहे. शाळेचा फिलाटेली क्लब असावा आणि संबंधित विद्यार्थी त्या क्लबचा सदस्य असणे आवश्यक आहे. शाळेचा क्लब नसेल तर त्या संबंधित विद्यार्थ्याचे स्वतंत्र फिलाटेली अकाऊंट असणे आवश्यक आहे.
शिष्यवृती परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते. प्रथम लेखी परीक्षा विभागीय स्तरावर घेतली जाईल. पहिल्या स्तरामध्ये निवड झालेल्या विद्यार्थांना अंतिम निवडीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये फिलाटेली प्रकल्प सादर करावा लागेल. अंतिम निवड केवळ फिलाटेली प्रकल्पामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेमध्ये ५० बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल. त्यात कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसेल. लेखी परीक्षा संपूर्ण विभागासाठी एकाच वेळी रत्नागिरीत घेतली जाईल. स्थळ नंतर कळविण्यात येईल. प्रकल्पाचा विषय सर्कल ऑफिसद्वारे देण्यात येणार असून, टपाल खात्याचे प्रतिनिधी आणि प्रसिद्ध फिलाटेलिस्ट यांचा समावेश असलेली एक समिती सर्कल पातळीवर स्थापन केली जाईल. त्या समितीमार्फत विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पाचे मूल्यमापन केले जाईल.
या योजनेसाठीची लेखी परीक्षा 28 सप्टेंबर रोजी होईल. इच्छुक शाळा प्रतिनिधींनी सहभागाकरिता जवळील पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करावा आणि आपले अर्ज नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये 9 सप्टेंबरपर्यंत जमा करावेत. यावर्षीच्या या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 31 विद्यार्थ्यांनी 2023-24 या आर्थिक वर्षातत या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता. त्यामधील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम शाळेच्या एका विद्यार्थ्याची महाराष्ट्र सर्कल स्तरावर निवड होऊन त्याला शिष्यवृत्ती प्राप्त झाली, असेही कळविण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 26-08-2025














