राजापूर-लांजा तालुक्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत बैठक

राजापूर : राजापूर लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघातील अंबा बागायतदार आणि शेतकरी बांधवांचे विविध समस्या संदर्भात आमदार किरण सामंत यांनी आढावा बैठक घेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

या बैठकीमध्ये आंबा बागायतदारांच्या विविध समस्या संदर्भात चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन आ. सामंत यांनी दिले.

शेतकऱ्यांना बँकामार्फत तीन लाख रूपयां पर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते त्याची मर्यादा दहा लाख पर्यंत करण्यात यावी तसेच त्याची सध्या असलेली २२०० प्रती झाड ही मर्यादा वाढवून ती जेवढी जास्तीत जास्त करता येईल त्याबाबतीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ प्रतिनिधी ह्यांनी त्याबाबत नव्याने निकष ठरवावेत असेही आ. सामंत यांनी नमुद केले.

सन २०२४ २५ च्या हंगामातील विमा परतावा त्याचे निकष विमा कंपनीने लवकरात लवकर जाहीर करून विमा परतावा लवकरात लवकर अदा करावा, पिक विमा आकारणी पूर्वीप्रमाणे खराब्यासहित करणे शक्य नसल्याने सातबारावरील खराबा क्षेत्राचे वरकस मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी तहसीलदार व भूमीअभिलेख मार्फत उपाययोजना करण्यात याव्यात, पिक विमा कालावधी 1 ऑक्टोबर ते 31 मे असा असावा, शेतकऱ्यांना विक्री केल्या जाणाऱ्या कीटकनाशक, खते इत्यादीच्या किमतीवर नियंत्रण असावे त्यावर आकारला जाणारा GST रद्द करण्याबाबत मागणी करण्यात आली, थ्रीप्स, तुडतुडे ई रोगावर वर परिणामकारक प्रभावी कीटकनाशकेकोणती वापरावीत त्या बाबत विद्यापीठ व कृषी विभाग ह्यांनी संशोधन करावे, शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर मेळावे आयोजित करावेत, शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापना करण्याबाबत प्रयत्न करावेत, वानर, माकड इत्यादीच्या त्रासाबद्दल वनअधिकारी ह्यांना वानर माकड पकडणारी टीम बोलावणे बाबत सूचना देण्यात आल्या, एप्रिल व मे 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वारे ह्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत ज्यांचे नुकसानी बाबत पंचनामे महसूल विभाग मार्फत झालेले नाहीत अश्याना नव्याने पंचनामे करण्याबाबत उपाययोजना कराव्यात, रत्नागिरी लांजा राजापूर तालुक्यांना एआय तंत्रज्ञानामध्ये समावेश करण्यात यावा, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असावी. कोकणातील स्थानिक वातावरणानुसार विम्याचे निकष ठरवण्यात यावे याबाबत वरिष्ठानकडून तात्काळ निर्णय घेऊन त्या पद्धतीने कारवाई करावी, 2026- 27 पासून विमा कालावधी हा 1 ऑक्टोंबर ते 31 मे असा असावा, सर्व कर्जदारांना सरसकट कर्जमाफी मिळावी,

अशा विविध विषयांवरती आमदार किरण सामंत यांनी शेतकरी व अधिकारी यांच्याशी चर्चा केली. आंबा बागातदारांच्या समस्या सोडवण्याबाबत काटीबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले, तहसीलदार विकास गंबरे, लांजाच्या तहसीलदार प्रियंका ढोले , फिरोज शेख, कृषीविभाग अधिकारी, कोकण कृषी विद्यापीठ प्रतिनिधी एस. एस. गव्हाणकर, डॉ.किरण मावशी, जिल्हा बँक संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर, जिल्हा बँकेचे अधिकारी संजय बाकाळकर, तालुका कृषी अधिकारी अमोल सकपाळ यांसह राजापूर लांजा मधून आंबा, काजू उत्पादक शेतकरी- सुरेंद्र कारेकर, रवींद्र सकपाळ, ॲड. समीर कुंटे, प्रकाश डुकळे, दीपक उर्फ नानू आडीवरेकर, सुहास फोडकर, राकेश सातोपे,जयवंत हळदणकर, राजेश पारकर, ओंकार प्रभुदेसाई, आबीद काझी, जावेद काळसेकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 26-08-2025