चिपळूण : घरांच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या १४ कामगार संघटनांच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीची बैठक राष्ट्रीय मिल मजूर संघाच्या मुंबईतील कार्यालयात समितीचे प्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत झाली. ९ जुलैचे आंदोलन, १० जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमेवत सकारात्मक बैठक झाल्यानंतरही घरांसंदर्भात अध्यादेश काढण्यात आलेला नाही. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा नाही. त्यामुळे मुंबई, कोकण व राज्यातील गिरणी कामगार व वारसदारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रश्नावर सरकारने लवकरच सकारात्मक निर्णय न घेतल्यास अनंत चतुर्दशीनंतर कामगार संघटनांनी महाआंदोलनाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सकारात्मक बैठक झाली. मात्र त्यानंतरही अद्याप घरांबाबत ठोस कार्यवाही झालेली नाही. तसेच शेलू आणि वांगणी येथील घरे गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने नाकारली होती.
ती बांधलेली घरे विकत घेण्यासाठी खासगी विकासकांकडून कामगार आणि वारसांवर अद्यापही दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. तसेच गिरणी कामगारांनी घरे घेतल्यासंबंधी खोटी आकडेवारी प्रसिद्ध करून कामगारांची दिशाभूल केली जात आहे. या सर्वच प्रश्नांची माहिती देण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर पत्र देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून त्यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेण्यात येणार आहे.
या बैठकीत लढा समितीचे निमंत्रक आणि राष्ट्रीय मिल मजदर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, तसेच खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, गिरणी कामगार सेनेचे सत्यवान उभे आदींसह अन्य कामगार नेत्यांनी या प्रश्नावर सडेतोड विचार मांडले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 28-Aug-25














