गुहागर/चिपळूण: गणेशोत्सवासाठी गुहागरहून आपल्या मूळ गावी हिंगोलीकडे निघालेले आणि मंगळवारपासून बेपत्ता असलेले शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण व त्यांचे कुटुंब अखेर सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे सुखरूप सापडले आहे. त्यांच्याशी संपर्क झाल्याने कुटुंबाने आणि मित्रपरिवाराने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नेमके काय घडले?
गुहागर येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी आपल्या खासगी वाहनाने हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गणेशोत्सवासाठी निघाले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते चिपळूण परिसरात पोहोचले होते, त्यावेळी त्यांचे कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे झाले होते. मात्र, त्यानंतर अचानक त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा, दोघांचेही मोबाईल फोन बंद झाले.
त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ न शकल्याने हिंगोली येथील त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती. त्यांनी तात्काळ शोधाशोध सुरू केली. चव्हाण यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार हिंगोलीहून त्यांच्या शोधासाठी निघाले होते आणि त्यांनी सर्व संभाव्य ठिकाणी चौकशी सुरू केली होती. सोशल मीडियावरही चव्हाण कुटुंब बेपत्ता झाल्याची बातमी वेगाने पसरली होती, ज्यामुळे अनेकजण चिंतेत होते.
अखेर चिंता मिटली
चव्हाण कुटुंब सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा फोन पावसात भिजल्याने तो बंद होता असे कारण आता समोर आले आहे. आता ते सर्वजण सुरक्षित असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. एका शिक्षकाचे कुटुंब सणासुदीच्या काळात अशा प्रकारे बेपत्ता झाल्याने निर्माण झालेली चिंतेची भावना आता निवळली आहे.














