Ratnagiri : फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये ‘रस्ता सुरक्षा’ विषयावर चर्चासत्र

रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी येथे महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम जागरूकता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियम, रस्ता सुरक्षा, हेल्मेट वापर, अपघातांची सद्यस्थिती तसेच नालसा (NALSA) हेल्पलाईन क्रमांक १५१०० व नालसा पोर्टल याबाबत जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी करून रस्ता सुरक्षा जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले. या वेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक श्री. हृषीकेश कोराणे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री. जयंत राने व श्री. मोहसिन आटी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत वाहतूक नियम, रस्ता चिन्हांचे अर्थ, हेल्मेट वापरण्याचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.कार्यक्रमाच्या समारोपाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे अध्यक्ष व वरिष्ठ स्तर प्रथम श्रेणी न्यायाधीश मा. श्री. राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाहन चालविताना दक्षता, कायद्याचे पालन आणि जनजागृती याचे महत्त्व पटवून दिले. तसेच नालसा हेल्पलाईन व पोर्टल सर्वसामान्य नागरिकांसाठी कसे उपयुक्त आहे याबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमात १५६ विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. विशेष म्हणजे १० विद्यार्थ्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी तर्फे हेल्मेटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम एनएसएस प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. उमेश सामंत, महिला प्रोग्रॅम ऑफिसर प्रा. हर्षदा केळकर, प्रा. सचिन राने, प्रा. प्रियंका दाते व तांत्रिक सहाय्यक श्री. परेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाला

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:45 PM 28-Aug-2025