रत्नागिरी : गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पालिकेने केलेल्या विविध तयारींचा आढावा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी घेतला.
सर्व विसर्जन घाट सज्ज ठेवण्याची सूचना त्यांनी केली.
सर्व विभागप्रमुखांसमवेत आयोजित बैठकीत शहरातील स्वच्छता, सुरक्षा, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा तसेच विसर्जन घाटांवरील सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्याधिकारी भोसले यांनी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, नगर अभियंता दीपक निबांळकर, विद्युत विभागप्रमुख संगीता तांबोळी, उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर, नागरी सुविधा केंद्र प्रमुख वलीद वांगडे तसेच बांधकाम मेस्त्री रवी सातपुते यांच्यासह प्रत्यक्ष विसर्जन घाटांची पाहणी केली.
विसर्जन घाटांवरील सर्व प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. काही ठिकाणी पूरक सुविधा उभारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. याबाबत तातडीने कार्यवाही करून आवश्यक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 02-09-2025














