Lanja: देखाव्यातून साकारली लोअर परळची चाळ

लांजा, Lanja : गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात विविध देखावे सादर करून त्याद्वारे समाज प्रबोधन करणार्या तालुक्यातील वनगुळे येथील पंकज पांचाळ व कुटूंबियांनी यावर्षी लोअर परळ ची चाळ चा देखावा सादर केला असून त्याद्वारे चाळीत राहणाऱ्या माणसांचे जीवनमान, जगण्याची शैली यावर भाष्य केले आहे.

नोकरी व्यवसाया निमित्ताने मुंबई येथे वास्तव्याला असलेल्या पंकज गणेशोत्सवात आपल्या वनगुळे गावी दाखल होतो. संपूर्ण पांचाळ कुटुंब गणेशोत्सव उत्साहात साजरा करते. पंकज हा गेली कित्येक वर्षे समाजप्रबोधन करणारे देखावे सादर करून समाज प्रबोधित करत आहे. स्वतः उत्तम छायाचित्रकार असलेला पंकज भविष्यात अजून उत्तम देखावे तयार करेल हे त्याच्या नजरेतून दिसून येते.

याबाबत माहिती देताना पंकज म्हणाला की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी काहीतरी नवीन सजावट करायची असा मनात विचार आला होता. खूप कल्पना समोर आल्या पण ठरलं ते चाळ देखावा करायचा . लहानपणी शाळेची सुट्टी पडली की आमची पावलं जायची ती मुंबई मध्ये आणि तिकडे सुट्टीत मज्जा करायची ती अनोखी ओळख म्हणजे खर सुख. आणि याच साऱ्या आठवणी आपण देखाव्यातून सुद्धा जगासमोर आणू शकतो असा मानस घेऊन यासाठी तयारी सुरू केली. अगदी प्रत्येक बारकावे हे या मध्ये नमूद केले आहेत. चाळीमध्ये राहणाऱ्या माणसांमधील विविधता तसेच त्यांचे राहणीमान नेहमीच्या वापरात येणाऱ्या प्रत्येक लहान सहान बाबी या मध्ये ठळक पणे दाखवल्या आहेत.

गणेशोत्सवामध्ये चाळीतील भक्तिमय वातावरण कसे असते हे सुद्धा या मध्ये दाखवले आहे. असे पंकज पांचाळ यांनी सांगितले.पंकज पांचाळ हे स्वतः कलाकार असल्यामुळे त्यांच्या कडे प्रत्येक वर्षी गणपती सजावटीसाठी एक नवीन कल्पना असते तशीच यावर्षी त्यांनी हा देखावा सादर करत असताना मुंबई लोअर परळ येथील मानाजी राजुजी चाळ याची प्रतिकृती दाखवली. या चाळी मध्ये पांचाळ कुटुंबीयांचा बराच काळ गेला असल्यामुळे त्याबद्दल माहीत सांगत असताना संपूर्ण कुटुंब थोडं भाऊक झालं.

गेल्या काही वर्षापूर्वी या चाळीच्या ठिकाणी भव्य इमारत तयार झाली आहे त्यामुळे या चाळीच्या आत्ता फक्त आठवणी शिल्लक आहेत.

हा देखावा सादर करत असताना घनश्याम मेस्त्री, भरत पांचाळ, राजेंद्र गोठणकर, बाबू गोठणकर , राजेश पांचाळ , दूर्वेश पांचाळ यांची खूप मेहनत घेतली आहे. हा देखावा सध्या गणेश भक्तांसाठी लक्षवेधी ठरला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 02-09-2025