गुहागर : गुहागर तालुक्यातील अंजनवेल फाटा ते अंजनवेल या दरम्यान दुचाकीवरून प्रवास करत असताना रानगव्याने थेट हल्ला चढवल्याने अंजनवेल येथील आंबा व्यापारी प्रकाश गोपीनाथ खडपे (वय ६७) हे गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना रविवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान घडली.
प्रकाश खडपे हे दुचाकीवरून अंजनवेल फाटा येथून अंजनवेल गावामध्ये जात होते. या रस्त्यावरून जात असताना रानगव्याने थेट हल्ला करत जोरदार धडक दिली. यामुळे ते मोटरसायकलसह लांब फेकले गेल्याने जबर मार बसला आहे. रानगव्याने थेट त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला मार बसला आहे. फ्रैक्चर आहे. त्यांच्यावर कराड येथील रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे.
या घटनेमध्ये ते चालवत असलेली मोटरसायकल (एमएच ०८ आर ६६९८) चे नुकसान झाले आहे. गुहागर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पोलिस पाटील अंजनवेल यांच्यासमवेत पंचनामा यादी तयार केली.अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनी परिसरामध्ये इस्कॉन कंपनीच्या वतीने येथील परिसरातील मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. यामुळे जंगलामध्ये अधिवास असलेले रानगवे रस्त्यावर येऊ लागले आहेत. या हल्ल्याने येथील सर्व ग्रामस्थांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामुळे अंजनवेल फाटा ते अंजनवेल असा प्रवास करणे धोकादायक बनले आहे. यावर वनविभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ही अंजनवेलवासियांकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 03-Sep-2025










