Chiplun Ganpati Visarjan : ३२ हजार गणेशमूर्तीचे वाजत-गाजत विसर्जन

चिपळूण : ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपत्ती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात, भावपूर्ण वातावरणात विशेषकरून पारंपरिक चाह्य व टाळ-मृदुंगाच्या गजरात मंगळवारी (ता.२) गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. तालुक्यात ३२ हजार गणपतींचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर चाकरमानी परतीच्या वाटेला लागले.

शहरासह तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुण्यातील चाकरमानी बहुसंख्येने दाखल झाले होते. यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले होते. मंगळवारी गौरी गणपतीचे बिसर्जन बाजत गाजत व फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या उत्साहात करण्यात आले. विसर्जनावेळी शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाकडूनविसर्जन घाटावर विशेष नियोजन केले होते. शहरातील १२ बिसर्जन घाटाच्या ठिकाणी नगर परिषदेच्या प्रत्येकी पाच सफाई कामगारांची नेमणूक केली होती. तसेच काही महत्वाच्या विसर्जन घाटाच्या ठिकाणी विद्युत रोषणाईचीही व्यवस्था केली होती.

बाजारपुलासह बहादूरशेख नाका, गांधारेश्वर, रामतीर्थ तलाव, बायपास रोड, गोवळकोट आदी परिसरातील विर्सजन घाटाच्या ठिकाणी निर्माल्य कुंड ठेवण्यात आले होते.

विसर्जन सोहळ्यासाठी नेहमी गजबजणारे बाजारपूल, बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी पूल, गांधारेश्वर व रामतीर्थ तलावाचा परिसर चकाचक केला होता. त्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला, गणेश विसर्जन निमित्ताने बहुतांशी बाजारपेठेसह संपूर्ण दुकाने बंद होती. यानिमीत्ताने एसटी बस व अवजड वाहतूक बाजारपेठेतून बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत मोठा उत्साह निर्माण झाला होता. शहर व परिसरात सायंकाळी ४ वाजल्यापासून गणरायाच्या विसर्जन सोहळ्यास सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत हा सोहळा सुरु होता.

गोवळकोट येथेही एकाचवेळी ३०० हून अधिक गौरी गणपतीमूर्तीची पारंपरिक विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गणरायासोबत गौरीचे वाशिष्ठी व शिवनदीत मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. या शिवाय नगरपरिषदेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काहींनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित केल्या. विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी काही मंडळांनी जनजागृतीपर फलक उभारले होते. यानिमित्ताने विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावर्षी पावसाने गणेश विसर्जन मिरवणुकीत व्यत्यय आणला नाही, त्यामुळे गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला.

येथील उपविभागीय पोलिस अधिकारी बेले, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी शहर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. कुठेही अनुचीत प्रकार घडल्याचे वृत्त नसून मोठ्या जल्लोषात गौरी गणपतीला निरोप देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 03-Sep-2025