रत्नागिरी : शहरात आजही प्रामाणिकपणा टिकून आहे, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय नुकताच आला. शहरातील एका तरुण व्यापाऱ्याने रस्त्यात सापडलेले सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाला शोधून परत केले आहे. फैज स्पोर्ट्सचे मालक अरबाझ खान असे या प्रामाणिक व्यापाऱ्याचे नाव असून, त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी काय घडली घटना?
रत्नागिरी शहरातील गोडबोले स्टॉप येथे ‘फैज स्पोर्ट्स’ नावाचे दुकान चालवणारे अरबाझ खान हे नेहमीप्रमाणे आपल्या दुकानाकडे येत होते. त्याचवेळी त्यांना रस्त्याच्या कडेला काहीतरी चमकणारी वस्तू दिसली. जवळ जाऊन पाहिले असता ते १६ ग्रॅम ३०० मिली वजनाचे एक मौल्यवान सोन्याचे ब्रेसलेट होते. त्याची अंदाजे किंमत सुमारे १ लाख ७५ हजार रुपये इतकी होती.
मालकाचा शोध घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न
एवढी मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर अरबाझ यांनी ती स्वतःकडे न ठेवता, तिचा मूळ मालक शोधण्याचा निश्चय केला. त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या दुकानदारांकडे आणि परिसरातील लोकांकडे “कुणाचे ब्रेसलेट हरवले आहे का?” अशी चौकशी सुरू केली. तसेच, “जर कुणी शोधत आले तर माझ्या दुकानात पाठवा,” असे त्यांनी शेजारच्या दुकानदारांनाही सांगून ठेवले. मात्र, बराच वेळ झाला तरी कोणीही ब्रेसलेटवर हक्क सांगायला आले नाही.
सोशल मीडियाची मदत आणि मालकाचा शोध
यानंतर, अरबाझ यांनी ब्रेसलेटवरील कोडिंग किंवा हॉलमार्कवरून मालकाची काही माहिती मिळते का, हे तपासण्यासाठी शहरातील प्रसिद्ध ‘नाकोडा ज्वेलर्स’ यांच्याशी संपर्क साधला. नाकोडा ज्वेलर्सच्या मालकांनीही अरबाझ यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मालकाचा शोध घेण्याचा मोलाचा सल्ला दिला.
त्यानुसार, अरबाझ यांनी ‘एक सोन्याची वस्तू सापडली आहे,’ अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर टाकली. ही पोस्ट व्हायरल झाली आणि अखेर ब्रेसलेटचे खरे मालक, मिरजोळे येथील रहिवासी विशाल डाफळे यांच्यापर्यंत पोहोचली.
ब्रेसलेट परत मिळताच मालकाने मानले आभार
विशाल डाफळे यांनी तात्काळ अरबाझ खान यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपल्या हरवलेल्या ब्रेसलेटची अचूक ओळख पटवली. खात्री पटल्यानंतर अरबाझ खान यांनी कोणतेही आढेवेढे न घेता ते पावणेदोन लाखांचे ब्रेसलेट विशाल डाफळे यांच्या ताब्यात दिले. आपली हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने डाफळे यांना मोठा आनंद झाला. त्यांनी अरबाझ खान यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला.
आजच्या जगात आज प्रामाणिकपणा हरवत चाललेला असताना, तिथे अरबाझ खान यांनी दाखवलेला हा प्रामाणिकपणा समाजासाठी एक आदर्श उदाहरण ठरला आहे. त्यांच्या या कृतीमुळे रत्नागिरीतील व्यापाऱ्यांची मान अभिमानाने उंचावली आहे.














