रत्नागिरी : राजकारणात पदे आणि प्रतिष्ठा मिळवणारे अनेक असतात, पण पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या निधनानंतरही त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेते विरळाच. याचाच एक प्रत्यय देणारी घटना रत्नागिरीत घडली आहे. भाजपचे दिवंगत नेते आणि माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती विजयराव सालीम यांच्या सी.ए.चे शिक्षण घेणाऱ्या कन्येच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी वैयक्तिकरित्या ५ लाख रुपयांची मदत केली आहे. या मदतीची ठेव पावती (Deposit Slip) भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते सालीम कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या वर्षी भाजपचे निष्ठावंत नेते विजयराव सालीम यांचे अल्पशा आजाराने अकस्मात निधन झाले. त्यांच्या जाण्याने पक्षाने एक अहोरात्र मेहनत घेणारा, तळागाळात काम करणारा कार्यकर्ता गमावला होता. ही हानी पक्षासाठी आणि विशेषतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी होती. विजयराव सालीम यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची भावना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मनात सतत होती.
याच दरम्यान त्यांना समजले की, विजयराव यांची कन्या ज्ञानेश्वरी ही अत्यंत हुशार असून ती चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) सारखे उच्च शिक्षण घेत आहे. पितृछत्र हरपल्याने तिच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, या संवेदनशील विचाराने त्यांनी तिला मदतीचा हात देण्याचे ठरवले. रवींद्र चव्हाण यांनी ज्ञानेश्वरी सालीम हिच्या नावावर बँकेत ५ लाख रुपयांची मुदत ठेव (Fixed Deposit) ठेवली आहे. या रकमेवर दरवर्षी ५२,००० रुपये व्याज मिळणार आहे, जे तिच्या शैक्षणिक खर्चासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. या आर्थिक आधारामुळे ज्ञानेश्वरीला आता आपले सी.ए. होण्याचे स्वप्न कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करता येणार आहे.
या ५ लाख रुपयांच्या मुदत ठेवीची पावती भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते सालीम कुटुंबीयांकडे एका भावपूर्ण वातावरणात देण्यात आली. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष (दक्षिण) दादा दळी, सरचिटणीस उमेश देसाई, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा वर्षाताई ढेकणे, शहर अध्यक्ष दादा ढेकणे, ग्रामपंचायत सदस्या आर्या सावंत यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सालीम कुटुंबीय उपस्थित होते. या घटनेतून भाजपने केवळ एक राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर एका कुटुंबाप्रमाणे आपल्या कार्यकर्त्याची आणि त्याच्या परिवाराची काळजी कशी घेतो, हे दाखवून दिले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 09-09-2025














