Chiplun : चिपळूण मटण-मच्छी मार्केटचा अहवाल पाठवण्याच्या सूचना

चिपळूण : शहरातील मटण-मच्छी मार्केटच्या दुरुस्ती कामाचा अहवाल पाठवा, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांना दिल्या आहेत. दुरुस्ती कामाबाबत माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी तक्रार केली आहे. त्यामुळे येथील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया थांबण्याची शक्यता आहे.

शहरातील मटण-मच्छी व भाजी मंडईची पूर्वीची इमारत पाडून त्या जागी नाय इमारती नगर परिषदेने बांधल्या आहेत; मात्र राजकारणामुळे हे दोन्ही प्रकल्प सर्व सोयीसुविधांनी पूर्ण होऊ शकलेले नाहीत. दोन्ही इमारतींमधील गाळ्यांचा लिलावही झालेला नाही. न.प.चे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी न.प. चे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेत या प्रकल्पांमधील गाळ्यांचा लिलाव करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीकडून भाजी मंडईतील ६२ गाळे, २१ ओटे, मटण मच्छी मार्केटमधील ४३ गाळे, पवन तलाव मैदान परिसरातील इमारतीतील ७ गाळे, गोवळकोट धक्का येथील कॅन्टीनचे फेरमूल्यांकन करून घेतले असून त्यानुसार आता हे सर्व प्रकल्प ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास मंजुरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे ना परतावा, अनामत रक्कम, भाडेही कमी करून घेतले आहे. त्यामुळे आता दोन्ही प्रकल्पांच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याची तयारी व्यावसायिकांनी दर्शविली आहे.

तत्पूर्वी स्ट्रक्चरल ऑडीट करून दुरूस्ती करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली होती. त्यानुसार सांगली महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून दोन्ही प्रकल्पांच्या इमारती मजबूत असल्याचे अहवालात नमूद आहे.

त्यामुळे मटण-मच्छी मार्केट इमारतीचे प्लास्टर, रंग व शटरची कामे करण्यास सुरुवात झाली. यासाठी चार लाखांचा खर्च येणार आहे. असे असताना या कामावर माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून हे काम थांबविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करून त्याचा अहवाल पाठविण्याच्या सूचना मुख्याधिकारी भोसले यांना केल्या आहेत. त्यामुळे ते काय अहवाल पाठवितात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 09/Sep/2025