रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे यांनी ग्राहक कायद्यातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात देशात प्रथम क्रमांक पटकावला.
याबद्दल त्यांना बेंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम बेंगळुरू येथे झाला. यावेळी इंदुमती मलुष्टे यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. सूर्यकांत यांच्या हस्ते प्रावीण्य प्रमाणपत्र आणि पदविका प्रदान करण्यात आली. समारंभाला सर्वोच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्ती, कायदा विद्यापीठातील अनेक मान्यवर उपस्थित होते. एक वर्ष कालावधीच्या या ग्राहक कायद्यातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात देशभरातील अनेक वकील, न्यायाधीश, भारतीय प्रशासकीय आणि पोलीस सेवेतील अधिकारी, कर्मचारी, विविध सरकारी आणि खासगी कंपन्यांमधील विधी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
तीन कठीण परीक्षांमध्ये अव्वल स्थान मिळवल्याबद्दल इंदुमती मलुष्टे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील न्यायव्यवस्थेला आणखी बळकटी मिळेल, अशी भावना ग्राहक आणि वकील वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. वकिली व्यवसाय ग्राहक कायद्याच्या बाहेर राहील, ज्यातून वकिलांनादेखील न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया अभिनंदन करताना रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 12-09-2025














