Ratnagiri : खेडशी गावात गवारेड्यांकडून भातशेतीची नासाडी

रत्नागिरी : शहरालगत असलेल्या खेडशी गावातील डफळचोळवाडीत गवारेड्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. महिनाभरापासून हे गवे रात्री-अपरात्री शेतात घुसून भातशेती व फळबागांचे मोठे नुकसान करत आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दिवसाढवळ्याही गव्यांचा कळप गजबजलेल्या वस्तीजवळही फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या हंगामातील भातशेती, पिकांचे आणि बागांचे नुकसान होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. खेडशी गावातील शेतकरी विश्वास खापरे यांच्या भातशेतीचे गव्यांनी नुकसान केले आहे. खेडशी चाँदसूर्या ते पानवलफाटा या भागात गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या गव्यांच्या कळपाचे दर्शन या भागात मिऱ्या-नागपूर महामार्गालगतच्या परिसरातील रहिवासी, महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना होत आहे. या परिसरात फिरणाऱ्या गव्यांच्या कळपाबाबत वनविभागाला ग्रामस्थांकडून खबर देण्यात आली आहे. तरीही त्यांच्या बंदोबस्ताबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 13/Sep/2025