राजापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेतर्गत जिल्हा परिषद गटासह पंचायत समिती गणांच्या पुनर्रचनेत राजापूर तालुक्यात ६ जि. प. गट तसेच १२ पंचायत समिती गणांच्या रचनेनंतर त्यावर घेण्यात आलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे १३ हरकती प्रशासनाकडून फेटाळण्यात आल्याची माहिती येथील तालुका प्रशासनाने दिली. त्यामुळे ६ जि. प. गट आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२ पंचायत समिती गणांची रचना कायम रहाणार आहे.
तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट आणि त्या अंतर्गत १२ पंचायत समिती गण यांची नव्याने प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यानंतर ती प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार एकूण १३ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक १२ हरकती पाचलमधून होत्या, तर एक हरकत देवाचे गोठणेमधून घेण्यात आली होती.
नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये अस्तित्वात असलेले जि.प. चे ६ गट आणि १२ पंचायत समिती गण ही संख्या कायम ठेवण्यात आली असली तरी ४ पंचायत समिती गण पूर्वीच्याच नावाने ठेवण्यात आले होते, तर उर्वरित ८ पंचायत समितीच्या गणांसह ६. जि.प. गटांची नावे बदलून ते नवीन नावाने अस्तित्वात आले होते.
या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या पुनर्रचनेबाबत २१ जुलैपर्यंत नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पाचल येथून एकूण १२, तर देवाचे गोठणे येथून १ अशा १३ हरकती येथील तहसील कार्यालयाकडे दाखल करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी पाचल हा जिल्हा परिषद गट होता. त्याऐवजी नव्या रचनेत त्याचे नाव बदलून नवीन नावानुसार तळवडे गट अस्तित्वात आला आहे. त्याला हरकती घेण्यात आल्या. दाखल हरकतीनुसार तळवडे जिल्हा परिषद गटाचे नाव पाचल असे करावे यासाठी पाचल ग्रामपंचायतीसह गावचे सरपंच बाबालाल फरास यांच्यासह पाचलमधून हरकती दाखल झाल्या होत्या, तर गोबळ गाव पूर्वी देवाचे गोठणे पंचायत समिती गणात होते. ते नव्या प्रभागरचनेत धोपेश्वर गणात घेण्यात आले आहे. त्यावर शिवणे गावचे ग्रामस्थ सिद्धेश मराठे यांनी हरकत नोंदविली होती, तर आडिवरे, वाडापेठही गावे भालवली पंचायत समिती गणात समाविष्ट व्हावीत याबाबतदेखील मराठे यांनी हरकत नोंदविली होती. त्या सर्व हरकती कोकण भवन येथील प्रशासकीय कार्यालयातून फेटाळण्यात आल्या आहेत, अशी माहिती राजापूर तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
तालुक्यातील जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या प्रभाग रचनेबाबत दाखल करण्यात आलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे १३ हरकती फेटाळण्यात आल्याने नव्याने करण्यात आलेली प्रभाग रचना साहजिकच कायम रहाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 15/Sep/2025














