Devrukh : नेटवर्कसाठी चक्क मचाणावर घेतली नारडुवे शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा

देवरूख : शासनाने जिल्हा परिषद शाळांमध्ये बऱ्याच गोष्टी ऑनलाईन सुरू केल्या आहेत. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात अनेक खेडेगावांतील दर्गम भागातील शाळेत अशा कामांसाठी नेटवर्क उपलब्ध नाही. त्यामुळे येथील शिक्षकांना शाळेपासून दूरवर जाऊन ही कामे ऑनलाईन करावी लागतात. यात केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांनी तर चक्क झाडांवरील मचाणावर विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली.

मुलांच्या निपूण भारत या अंतर्गत परीक्षा होऊ घातल्या, परंतु अजूनही नेटवर्क नसलेल्या शाळांपैकी संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे शाळेतील मुले निपूण भारतच्या परीक्षा देण्यावाचून वंचित राहत होती. ही बाब अनुभवी व तेवढेच व्यवहारी बुद्धिमान असलेले केंद्र प्रमुख दत्ताराम गोताड यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तेथे जाऊन थेट मुलांची परीक्षा झाडाला बांधलेल्या मचाणावर घेऊन मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून प्रशासकीय कामातही महत्त्वाचे योगदान दिले.

तांत्रिकदृष्ट्या अशक्य असणारी गोष्ट या केंद्रप्रमुखांनी आपल्या कौशल्याने सोडवून विद्यार्थी वर्गाला आनंद मिळवून दिला. अशक्य ते शक्य केल्याने दत्ताराम गोताड यांच्या या कृतीचे कौतुक नुसते केंद्रात, तालुक्यात, जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता याची दखल थेट स्टेट कौन्सिल ऑफ इज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग पुणे यांनी घेतली व गोताड यांच्या कृतीचे कौतुक केले.

नारडुवे सडेवाडी शाळेत मोबाईलला नेटवर्क नाही व ही परीक्षा दुसऱ्या गावात जाऊन देण्यासाठी, गावाबाहेर मुलांना पाठवायला पालक तयार नाहीत, अशी स्थिती असताना या ग्रामीण भागात केंद्रप्रमुख गोताड हे शाळेत पोहोचले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सदानंद जोगळे नावाच्या विद्याथ्यनि गोताड यांना भीत भीत सर तुम्हाला झाडावर चढता येतं का? केंद्रप्रमुखांनी पटकन हो म्हटले आणि त्यातून ही कल्पना सुचली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 15/Sep/2025