आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आता दिल्लीत आतिशी यांचं सरकार स्थापन झालं आहे. आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी आज राज निवास येथे त्यांना मुख्यमंत्री पदाच्या गोपनीयतेची शपथ दिली.

आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या सर्वात जवळच्या नेत्या मानल्या जातात, ज्यांना निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांनी आत्मविश्वासाने मुख्यमंत्रिपद दिले आहे. आतिशी यांच्या मंत्रिमंडळात 5 मंत्र्यांचा समावेश आहे. ज्यांनी आतिशी यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी आतिशी यांनी प्रस्तावित मंत्र्यांसह अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या घरी भेट घेतली. बैठकीनंतर आतिशी आणि इतर मंत्री पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘राज निवास’कडे रवाना झाले. आतिशी यांनी आज राजनिवास येथे इतर मंत्र्यांसोबत शपथ घेतली. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील 5 मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. यामध्ये सौरभ भारद्वाज, कैलाश गेहलोत, गोपाल राय, मुकेश अहलावत आणि इम्रान हुसेन या नावांचा समावेश आहे.

शपथ घेण्यापूर्वी आप नेते गोपाल राय म्हणाले की, जनतेसाठी काम करणे हे आमचे प्राधान्य आहे. दिल्लीच्या जनतेने आम्हाला काम करण्यासाठी निवडून दिले आहे. सरकारमध्ये हा बदल विशेष परिस्थितीमुळे झाला असून, या उरलेल्या महिन्यांत प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

आप नेते दिलीप पांडे म्हणाले की, आम आदमी पार्टी फोडण्याच्या उद्देशाने भाजपने ईडी, सीबीआय सारख्या घटनात्मक संस्थांचा कसा दुरुपयोग केला आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांना अटक केली हे संपूर्ण दिल्ली आणि देशाने पाहिले. दिल्लीतील जनतेने त्यांना तीनदा नाकारल्याने भाजपने त्यांचा बदला घेण्याचे ठरवले होते.

आतिशी यांनी 2020 मध्ये कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात त्या एकमेव महिला मंत्री होत्या. 17 सप्टेंबर रोजी आप आमदारांनी त्यांची एकमताने मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली. दिल्ली दारू धोरण प्रकरणात सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला होता आणि मनीष सिसोदिया हे देखील मुख्यमंत्रीपद भूषवणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 21-09-2024