भारताला आव्हान देताना विचार करावा लागेल : भैय्याजी जोशी

चिपळूण : सध्याची भारताची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे कोणालाही देशाला आव्हान देताना दहावेळा विचार करावा लागेल, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निवृत्त सरकार्यवाह, विद्यमान कार्यकारिणीचे वरिष्ठ सदस्य सुरेश उर्फ भैय्याजी जोशी यांनी केले.

कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात कोकणातील संघकार्य-गत ९२ वर्षांची यशस्वी वाटचाल या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सरकार चांगले असून चालत नाही, सामान्य माणसे महत्त्वाची आहेत. त्यांच्यामुळे आज देशाचे चक्र गतिमान आहे. ही गती आपल्याला कायम राखायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सैनिक नव्हते. ते सर्वसामान्य मावळेच होते. सर्वसामान्य मावळ्यांनी महाराजांना कशी साथ दिली, हे इतिहास सांगतो. यावरून सर्वसामान्यांचे महत्व अधोरेखित होते. मंडणगड ते सावंतवाडीपर्यंतचे तालुक्यातील संघ कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. संघाचे वरिष्ठ केंद्रीय कार्यकर्ते भैय्याजी जोशी यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले.

या वेळी कोकण विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक चाळके, खादी ग्रामोद्योग बोर्डाचे रवींद्र साठे, विवेक साप्ताहिकाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, कोकण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, पद्मश्री दादा ईदाते, राष्ट्रसेविका समितीच्या प्रचारिका चंदाताई साठये आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 26-09-2025

Khabardar diwali fest