रत्नागिरी, दि. ३ ऑक्टोबर : रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांमध्ये असलेला प्रचंड संताप आता राजकीय रणांगणाचा विषय बनला आहे. याच मुद्द्यावरून आज सकाळी शिवसेना (उबाठा) गटाने ‘चक्का जाम’ आंदोलनाची घोषणा करताच, सायंकाळी शिवसेना शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत ‘राजकीय पोळी भाजण्याचा’ प्रयत्न होत असल्याचा जोरदार प्रतिहल्ला चढवला. दिवसभरातील या नाट्यमय घडामोडींमुळे रत्नागिरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
उबाठाचा ‘चक्का जाम’चा इशारा
नागरिकांच्या संतापाला वाट मोकळी करून देत, आज सकाळी उबाठा सेनेचे नेते बाळ माने यांनी पत्रकार परिषद घेतली. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा निषेध करण्यासाठी उद्या (शनिवार, दि. ४ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता सर्व वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्यावर थांबवून १० मिनिटांसाठी ‘चक्का जाम’ आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आश्चर्याचा धक्का! शिंदे गट-भाजप एकत्र
एकीकडे मंत्री उदय सामंत महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचे संकेत देत असताना, दुसरीकडे स्थानिक भाजप पदाधिकारी अनेकदा वेगळा सूर लावताना दिसत होते. मात्र, आज या सर्वांना आश्चर्याचा धक्का देत शिवसेना शिंदे गट आणि भाजपने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या सक्त सूचनांमुळे हा बदल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“विकासकामांकडे दुर्लक्ष करून केवळ खड्ड्यांचे राजकारण” – महायुती
या संयुक्त पत्रकार परिषदेत उबाठा सेनेवर जोरदार टीका करण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर म्हणाले, “मंत्री उदय सामंत यांनी युतीच्या माध्यमातून विकासकामांसाठी भरघोस निधी आणला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून केवळ खड्ड्यांचा एकच मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. आता रस्त्यांची कामे सुरू झाल्यावर केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे.”
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सल्ला देताना म्हटले की, “आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू होत आहे. या चांगल्या कामाचे उबाठाने अभिनंदन करायला हवे.”
नगरपालिकेनेही दिले कामाचे स्पष्टीकरण
या राजकीय आरो-प्रत्यारोपांदरम्यान, रत्नागिरी नगरपरिषदेनेही एक प्रसिद्धीपत्रक काढून रस्त्यांच्या कामाबद्दलची तांत्रिक बाजू स्पष्ट केली आहे. पत्रकात म्हटले आहे की: “शहरात ८ मे २०२५ पासून पाऊस सुरू झाल्याने मंजूर कामे करणे शक्य झाले नाही. पावसाळ्यात डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणचे प्लांट बंद असल्याने साहित्य उपलब्ध नव्हते. आता पावसाळा संपताच नगरपरिषद आणि MIDC स्मार्ट सिटी अंतर्गत मंजूर असलेली कामे सुरू करण्यात येणार आहेत.”
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : “सध्या पावसाळी डांबर आणि डबर सोलिंगने तात्पुरते खड्डे भरले जात आहेत. तसेच, नाशिक येथील Golden Naxus LLP या कंपनीकडून ‘Golden Drop Cold Mix Reactive Asphalt’ हे ५० टन आधुनिक मटेरियल मागवण्यात आले असून, प्रायोगिक तत्त्वावर मारुती आळी आणि राम आळी येथील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे,” अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
एकंदरीत, उबाठाच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर महायुतीने आक्रमक पवित्रा घेतल्याने आणि प्रशासनाने कामाची माहिती दिल्याने रत्नागिरीतील खड्ड्यांचे राजकारण चांगलेच पेटले आहे.














