Rinku Singh : रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी!

Indian Cricketer Rinku Singh News : आशिया कपच्या फायनलमध्ये चौकार मारून भारताला विजय मिळवून देणाऱ्या रिंकू सिंगला दाऊदच्या गँगची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिंकूकडून तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून, त्यापैकी एकाने खंडणी मागितल्याची कबुली दिली आहे. अलीकडेच रिंकू सिंगने आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजयी चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला होता आणि तो एकाच क्षणात चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, आता त्यालाच अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

झीशान सिद्दीकीला पण मिळाली धमकी

काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याला धमकीचे फोन येत होते. या फोनद्वारे त्याच्याकडून तब्बल 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीने चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. तपासात उघड झाले की, या आरोपीने भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग याच्याकडूनही खंडणीची मागणी केली होती. या आरोपींची नावे मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नविद अशी असून, त्यांना वेस्ट इंडिजमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजने त्यांना भारताच्या ताब्यात दिले.

रिंकू सिंगला तीन वेळा धमकीचे मेसेज अन्…

स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंगकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यासाठी त्याने 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी नेमके 7 वाजून 57 मिनिटांनी पहिला संदेश पाठवला. त्या संदेशात त्याने लिहिले होते की, ‘आशा आहे तुम्ही ठीक असाल. मी तुमचा सर्वात मोठा चाहता आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही केकेआर संघाकडून खेळत आहात. रिंकू सर, मला खात्री आहे की एक दिवस तुम्ही आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचाल. साहेब, एक विनंती आहे, जर तुम्ही थोडी आर्थिक मदत करू शकलात, तर अल्लाह तुम्हाला आणखी बरकत देईल, इंशाअल्लाह.’ या संदेशाला कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे नवीदने 9 एप्रिल 2025 रोजी रात्री 11 वाजून 56 मिनिटांनी रिंकू सिंगला दुसरा संदेश पाठवला, ‘मला 5 कोटी रुपये हवे आहेत. वेळ आणि ठिकाण मी ठरवीन. तुमची खात्री (confirmation) पाठवा.’ या दुसऱ्या खंडणीच्या संदेशालाही रिंकू सिंगकडून उत्तर मिळाले नाही. यानंतर 20 एप्रिलला सकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी त्याने इंग्रजीत आणखी एक संदेश पाठवला, ‘Reminder! D-Company.’

नवीद हा बिहारमधील दरभंगा जिल्ह्याचा रहिवासी आहे. 28 एप्रिल रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वप्रथम त्याच्यावर लुकआउट नोटीस (LOC) जारी करण्यात आली, आणि त्यानंतर रेड कॉर्नर नोटीसही जारी झाली. या कारवाईमुळे अखेर नवीदला अटक करणे शक्य झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 09-10-2025