चिपळूण : गेल्या दोन आठवड्यांपासून कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात व नाचणी या प्रमुख हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून नुकसानाचे पंचनामे सुरू असतानाच महसूल विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत विभाग मिळून तिन्ही यंत्रणांकडून तालुक्यातील १६८ गावांत संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तहसीलदार प्रवीण लोकरे, पंचायत समिती गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील आणि तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे या तीन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तालुक्यातील १३० ग्रामपंचायत क्षेत्रात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तहसील कार्यालयाच्या आदेशानुसार तालुक्यातील एकूण १६८ गावांमध्ये संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त पथकांकडून पंचनामे करण्यात येणार आहेत.
सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ कामाला लागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान वास्तव स्वरुपात नोंदवून लुकास्तरीय समितीकडे अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 06/Nov/2025












