“युती न झाल्यास आमचीही तयारी,” उदय सामंतांचा इशारा; काल रात्री निलेश राणेंसोबत खलबते

◼️ “युतीसाठी नरमाईची भूमिका म्हणजे हतबलता नव्हे, विरोधकांना ‘संजीवनी’ मिळू नये हाच उद्देश.”

मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील महायुतीच्या राजकारणावर स्फोटक भाष्य केले. रत्नागिरी जिल्ह्यासाठी महायुती निश्चित झाली असली तरी, सिंधुदुर्गामध्ये मात्र भाजपकडून ‘मैत्रीपूर्ण लढती’ची भाषा होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत, “तशी वेळ आल्यास आमचीही तयारी झाली आहे,” असा स्पष्ट इशारा दिला.

याचवेळी, रत्नागिरीतील कथित डांबर घोटाळ्यावरून आरोप करणाऱ्या बाळ माने यांच्यावर, “ज्यांना लोकांनी चार वेळा डांबर फासले,” अशा शब्दात त्यांनी घणाघाती हल्ला चढवला.

सिंधुदुर्गात युती की ‘मैत्रीपूर्ण’ लढत?
उदय सामंत म्हणाले, “शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेबांची जी भूमिका आहे, तीच आमची आहे. काल मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्याची युती निश्चित झाली. शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक आघाडी (Natural Alliance) आहे, त्यामुळे आम्ही एकत्र येऊन राष्ट्रवादीला सोबत घेतले पाहिजे, ही आमची भूमिका आहे.”

“मात्र, सिंधुदुर्गामध्ये स्वतः पालकमंत्री (रवींद्र चव्हाण) ‘मैत्रीपूर्ण’ लढायचं म्हणत आहेत. आज राणे साहेबांचीही पत्रकार परिषद आहे. ठीक आहे, जर युती करून लढायचं नसेल, मैत्रीपूर्ण लढायचं असेल, तर आमची देखील तयारी झालेली आहे,” असे सामंत यांनी ठामपणे सांगितले.

ते पुढे म्हणाले, “काल रात्री साडेअकरा वाजता आमची एक बैठक झाली. त्यात मी, आमदार निलेशजी राणे, दत्ता सामंत, संजू परब, राजन तेली आणि संजय पडते, संजय आंगरे उपस्थित होतो. आम्ही देखील आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी तयार केली आहे. आम्ही कधीपर्यंत वाट बघायची? आमची ताकद नाही असं नाही. तीनपैकी दोन आमदार (दीपक केसरकर, निलेश राणे) आमचे आहेत, ५० टक्क्यांपेक्षा जास्त ताकद आमची आहे.”

दीपक केसरकरांच्या सन्मानावरून ठणकावले
दीपक केसरकर यांच्यावर नितेश राणे यांनी केलेल्या टीकेसंदर्भात सामंत म्हणाले, “तुम्ही दीपक भाईंची राजकीय कारकीर्द बघितली, तर ते किती संयमी आहेत हे सर्वांना माहिती आहे. अशी व्यक्ती ज्यावेळी दुखावली जाते, तेव्हा त्यात तथ्य असू शकतं. काल मी सावंतवाडीतही सांगितलं, की माझी राजकीय कारकीर्द देखील दीपक भाईंनी बघितली आहे, ते आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची कोणी अवहेलना करू नये, आणि एवढे आम्ही स्वस्थ पण नाही आहोत.”

“नरमाईची भूमिका म्हणजे हतबलता नव्हे”
महायुतीत शिवसेनेची भूमिका लवचिक का? या प्रश्नावर सामंत म्हणाले, “ही लवचिक भूमिका नाही, ही नरमाईची आणि नम्रतेची भूमिका आहे. याचा अर्थ आम्ही हतबल नाही. आम्ही संयमाने युती करा सांगतोय, कारण आमच्या भांडणामध्ये, आमचा जो विरोधक आहे (MVA), ज्याचं सध्या कुठेही अस्तित्व दिसत नाही, त्याला परत नवी ‘संजीवनी’ मिळू नये, हीच आमची भूमिका आहे.”

भाजपला रोखण्यासाठी UBT सोबत जाणार नाही!
कणकवलीत ‘शहर विकास आघाडी’त शिंदे सेना आणि ठाकरे गट भाजपविरोधात एकत्र येणार का? यावर सामंत म्हणाले, “भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेतर्फे (शिंदे गट) महाराष्ट्रात कुठेही पाऊल टाकले जाणार नाही. UBT बरोबर युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कणकवलीतील ‘शहर विकास आघाडी’ ही सर्वपक्षीय दिसते, ती पक्षाची नाही. स्थानिक पातळीवर कोणी आमच्या नावाचा उपयोग करत असेल, तर आम्ही कोणाचं तोंड धरू शकत नाही. आम्ही सगळ्यांनी सिंधुदुर्गची निवडणूक बाल्कणीत बसून बघूया, निकालानंतर कळेल कोणाचं किती अस्तित्व आहे.”

“ज्यांना ४ वेळा डांबर फासलं, त्यांच्यावर काय बोलणार?”
बाळ माने यांनी रत्नागिरीत ४४ कोटींच्या (संभाव्य आकडा ४४० कोटी) डांबर घोटाळ्याचा आरोप केल्यावर उदय सामंत संतापले. ते म्हणाले:

“कोणाचा प्रश्न विचारताय मला? ज्याला चार वेळा डांबर फासलय लोकांनी, त्यांच्यावर मी बोलत नाही. हा माझ्यावर आक्षेप नाही, हा माझ्या वडिलांवर आक्षेप आहे. माझ्या वडिलांनी १६ हजाराचं पहिलं काम घेतलं होतं, आज ते १६ कोटींची कामं घेत असतील. ही २५ वर्षांपासूनची जुनीच टेप आहे. २००४, २००९, २०१४ ला हीच टेप होती. २०१९ ला ते माझ्यासोबत आले, आता परत तिकडे गेले, परत तीच टेप सुरू झाली.”

ते पुढे म्हणाले, “जी लोकं मला पन्नास हजार, एक लाखाच्या मताधिक्याने निवडून देतात आणि हे (माने) पडतात, त्यांच्यावर मी काय बोलायचं? असुया (जळफळाट) असू नये. त्यांचे मुलंही कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनीही मोठं व्हावं. त्यांच्या बोलण्याला मी किती किंमत द्यायची, हे मला कळलं पाहिजे.”

पार्थ पवार ते आडाळी: इतर महत्त्वाचे मुद्दे
पार्थ पवार प्रकरण: “पार्थ पवारांच्या कंपनीला स्टॅम्प ड्युटीत सूट दिल्याचा ‘फेक नरेटिव्ह’ पसरवला जातोय. हा विषय महसूल विभागाचा (तहसीलदार) आहे, माझ्या उद्योग खात्याचा नाही. आमच्याकडे फक्त IT पार्कसाठी इंटेंट लेटर (आशय पत्र) दिलं होतं. अजित दादांचा राजीनामा मागणारे विरोधक अजित दादांना घाबरतात हेच सिद्ध होतं.”

आडाळी MIDC: “आडाळीत जागेचे दर कमी करूनही विक्री होत नव्हती, म्हणून गोल्फ कोर्सचा विचार होता. पण दीपक भाई, संजू परब आणि स्थानिक सरपंचांशी चर्चा करून त्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. आता लोकांच्या इच्छेनुसार पुन्हा प्लॉट ओपन केले जातील.”

नारायण राणेंची भेट: “अजून निश्चित नाही, पण त्यांना वेळ असेल तर नक्की भेटीन. सिंधुदुर्गाच्या विकासात्मक जडणघडणीत राणे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांनी जिल्ह्याला पर्यटनाची दिशा दिली. ते आमचे सीनियर नेते आहेत, त्यांच्या सल्ल्यानेच जायचं असतं.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:55 08-11-2025