Ratnagiri : राज्य नाट्य स्पर्धेत ‘अकल्पित’ नाटकाने आणले रसिकांच्या डोळ्यात पाणी

रत्नागिरी : ज्योतिषशास्त्र तसेच विज्ञानाचा आधार घेत प्रेमप्रकरणात आलेले चढ उतार याची सांगड उत्कृष्ट अभियानातून घालत पालशेत, गुहागर येथील दर्यावर्दी प्रतिष्ठानने सादर केलेल्या ‘अकल्पित’ या नाटकाने रसिकांच्या डोळ्यात चटकन पाणी आणले. नाट्य स्पर्धेच्या सुरुवातीलाच या नाटकाने दमदार सलामी दिली आहे.

राज्य नाट्य स्पर्धेला रत्नागिरी केंद्रावर सावरकर नाट्यगृहात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत गुहागर या संस्थेने लेखक हरिष सामंत व दिग्दर्शक संदीप वणकर यांनी एक सामाजिक विषयावर अकल्पित हे नाटक सादर केले. कथा भावनिक व दमदार अभिनय असल्यामुळे रसिकांच्या डोळ्यात चटकन पाणी आणण्यात कलाकार यशस्वी झाले.

इन्कमटॅक्सच्या ऑफीसमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या भोवती ही कथा फिरते. या व्यक्तीला ज्योतिषशास्त्रावर खूप विश्वास असतो. प्रत्येक गोष्ट तो ज्योतिषशास्त्रानुसारच करत असतो. या व्यक्तीच्या पत्नीचे काही वर्षापूर्वी निधन झालेले असते. त्यांना मुलगा व मुलगी असे दोन अपत्य असतात. मुलगा डॉक्टर बनतो व बाहेरगावी असतो. तर मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत असते. यामुळे घरात ती मुलगी व त्यांचा नोकर अशी तिघेजण असतात. या कुटुंबांचे जीवन हसत खेळत चाललेले असते. ज्योतिषशास्त्राचे शास्त्री एकेदिवशी त्यांच्या घरात राहण्यासाठी एक तरुण पाठवतात.

हा तरुण या शहरात नोकरीला असतो. हा तरुण त्या मुलगीच्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचवेळी त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली होती. दोघांनाही लग्राच्या आणाभाका घेतलेल्या असतात. अचानक तो घरी आल्याने या घरात या दोघांची प्रेमकहाणी पुन्हा सुरू होते. परंतु हे प्रेम प्रकरण सुरु असताना त्या तरुणासमोर आपल्या मुलाबरोबरच अजून एक अनाथ आश्रमातील मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव ठेवते. त्याला तो तरुण मान्यता देतो आपण दत्तक मुल घेऊ, असे सांगतो आणि हा तरुण मुंबईत आपल्या घरी आठ दिवसांसाठी निघून जातो.

या प्रेमाची गोष्ट त्या मुलीच्या वडिलांना समजते. त्यांनी लगेच शास्त्रीबुवांना बोलवून या दोघांची पत्रिका दाखवतात. यावेळी शास्त्रीबुवा सांगतात की, या तरुणाला कधीही मुल होऊ शकत नाही. त्यामुळे या मुलीचे वडील नाराज होऊन तिला तरुणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यानच्या काळात बाहेरगावी डॉक्टर असलेल्या मुलाचा प्रवेश होतो. त्याचवेळी काही दिवसाने तो मुंबईत गेलेला तरुण येतो. त्यावेळी डॉक्टर असलेल्या शुभमन त्या तरुणाला बघताच तो फ्रॉड असल्याचे वडिलांना सांगतो. हा तरुण तरुणींना फसवतो, त्याचे लग्न झालेले आहे, असे सांगतो. व पोलिसांना बोलवून अटक करतो. यावेळी मात्र हा तरुण त्या मुलीसाठी त्याने आपली नसबंदी करून घेतलेली असते. यावेळी त्याने खोटी पत्नी उभी केलेली असते. ही गोष्ट नंतर समजते. त्या तरुणाचे लग्न झालेले नसते. त्याने त्या मुलीसाठी आपली नसबंदी केलेली असते.

शेवटी त्या तरुणाचे व मुलीचे लग्न लावून दिले जाते. अशी या अकल्पित नाटकाचे कथानक आहे. एका बाजुला ज्योतिषशास्त्रसुद्धा बरोबर आहे हे दाखवून देण्यात आले तर दुसऱ्या बाजूला प्रेमासाठी त्यांनी विज्ञानाचा आधार घेत नसबंदी सुद्धा केल्याचे उघड झाले.

या नाटकातील आकाश (तो तरुण-राकेश भोसले), पप्पा (मुलीचे वडील- विघ्नेश वणकर), नताशा (ती मुलगी – इषिका वणकर), शास्त्री (गणराज धोपावकर), शुभम (डॉक्टर-आशिष दाभोळकर), बंडोपंत (नोकर अमोल वायंगणकर) या सर्वांनीच दमदार अभिनय केला. तर बंडोपंतांची भूमिका अमोल वायंगणकर यांनी विनोदी अंगाने सादर करत रसिकांची मने जिंकली. त्याचबरोबर रंगभुषा श्रीकांत वायंगणकर, प्रकाश योजना-प्रशांत घवाळी, पार्श्वसंगीत – योगेश मांडवकर, वेशभुषा – सिद्धेश जांभारकर, नैपथ्य दिलिप धामणे यांनीसुद्धा भूमिका योग्यरित्या पार पाडली,

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 12/Nov/2025