राजापूर : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरीसाठी जमीन क्षेत्राची पूर्वी निश्चित करण्यात आलेली जागा अनेक लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा लाभ घेण्यामध्ये अडचणीची ठरत होती. जमीन क्षेत्रामध्ये शासनाने शिथिलता आणली आहे. मजुरीच्या दरामध्येही वाढ करण्यात आली आहे. अनुदानामध्येही वाढ होताना ती चार लाखांवरून सुमारे पाच लाख करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीचा लाभ घेण्याचा इच्छुक लाभार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातून वाढणाऱ्या लाभार्थ्यांमुळे सिंचन क्षेत्रामध्येही वाढ होणार आहे.
सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याला विहीर खोदाईसाठी अनुदान मिळताना त्याच्या जोडीने रोजगारही उपलब्ध होत आहे. विहिरीचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे सातबारा उताऱ्यावर किमान दीड एकर क्षेत्र असण्याची अट घालण्यात आली होती; मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे सलग क्षेत्राची दीड एकर जागा असलेला सातबारा उतारा नसल्याने सिंचन विहिरीचा लाभ घेण्याची इच्छा असूनही त्यांना विहिरीचा लाभ घेता येत नव्हता.
शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन शासनाने सिंचन विहिरीसाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये शिथिलता आणली आहे. त्यामध्ये दीड एकरवरून सिंचन विहिरीसाठी आवश्यक क्षेत्र एक एकरवर आणण्यात आले आहे. त्याचवेळी संबंधित शेतकऱ्यांची सामायिक जागा असेल तरीही सिंचन विहिरीचा लाभ घेता येणार आहे. दोन शेतकऱ्यांची सामाईक जागा असेल आणि सामायिक जमिनीलगतच्या शेतकऱ्यांना जर विहीर हवी असेल तर दोघांनाही प्रत्येकी एकेक विहीर आता नव्या निकषामुळे मंजूर होणार आहे. त्यामुळे आता लगतच्या शेतकऱ्यालाही सिंचन विहिरीचा लाभ मिळणे शक्य झाले आहे.
मजुरीचा दर २९७ रुपये
केंद्र शासनाने मनेरेगांतर्गत मजुरीदरात वाढ करताना २९७ रुपये मजुरी निश्चित करण्यात आली आहे. त्या मजुरीदराच्या ४० टक्केइतका कुशल खर्च हा सुमारे १९८ रुपये इतका अनुज्ञेय आहे. त्यामुळे प्रतिदिवस जवळपास ५०० रुपये अकुशल आणि कुशल म्हणून देता येऊ शकते. यावरून ९०० मनुष्य दिवसासाठी ४ लाख ५० हजार खर्च अपेक्षित आहे त्याशिवाय विहिरीच्या कामावेळी पाण्याचा उपसा व इतर खर्चासाठी सुमारे ५० हजार रुपये दिले जातात. एक एप्रिलपासून मनेरेगांतर्गत लागू केलेल्या प्रतिदिन २९७रुपये मजुरीदरानुसार विहिरीसाठी सुमारे ४ लाख ९९ हजार रुपये खर्च येत आहे. मजुरीसह अनुदानाच्या रकमेमध्ये झालेल्या वाढीमुळे सिंचन विहिरीचा लाभ घेणे शेतकऱ्याला अधिक सोयीचे झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 13/Nov/2025














