रत्नागिरी : पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनातून पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास गट २.० या प्रकल्पांतर्गत निवडक गावांतील लोकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पाणलोट विकासाला चालना देतानाच पाणी साठवण, सिंचनाला प्रोत्साहन आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धतेत सुधारणा यावर भर देणारी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी भाकर या संस्थेची निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १० गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
भाकर या स्वयंसेवी संस्थेची स्थापना कै. अरुणा पाटील यांनी १९९३ साली केली. ३२ वर्ष संस्थेने अनेक सामाजिक प्रकल्प राबवले. त्यापैकी महत्वाचे म्हणजे पाणलोट प्रकल्प, मजुरांच्या मुलांसाठी ४० बालवाड्या, माता व बाल संगोपन, ४५० बचत गट, गुजरात भूकंप मदत कार्य, चारा छावणी, महिला सहाय्यता कक्ष, स्वच्छ भारत अभियान, सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास, जल जीवन मिशन, महिला समुपदेशन केंद्र, लांजा व राजापूर, आजी-आजोबांचा गाव (वृद्धाश्रम) व महिला पुनरुत्थान केंद्र (महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे) अशा विविध यशस्वी प्रकल्पांचा समावेश आहे. सध्या भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था हि पाणलोट विकास कक्ष तथा माहिती केंद्र तथा, जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास गट २.० या प्रकल्पांतर्गत प्रकल्प प्रशिक्षण संस्था (PTO) म्हणून चिपळूण तालुका (प्रकल्प क्रमांक ४) मध्ये क्षमता बांधणी घटकांतर्गत पाणलोट विकास जाणीव जागृती, पीक व पाणी व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आंबेरे, गुढे, डूगवे, तनाळी, देवखेरकी, नारदखेरकी, पाथर्डी, मिरवणे, शिरवली, ओमळी या गावांमध्ये करीत आहे.
पाणलोट विकास कार्यक्रम २.० हा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत (PMKSY) राबवला जाणारा एक नवीन टप्पा आहे. हा कार्यक्रम ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागाने २०२१ मध्ये सुरू केला आहे. याचा मुख्य उद्देश पावसावर अवलंबून असलेल्या निकृष्ट जमिनीची उत्पादकता सुधारणे, शाश्वत उपजीविका निर्माण करणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत माती आणि जलसंधारण, वृक्षारोपण, सुधारित शेती पद्धती आणि पशुधन व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
या कार्यक्रमात संस्थेमार्फत सामाजिकशास्त्र तज्ञ पवनकुमार मोरे, कृषी तज्ञ राजेंद्र पाटील, समूह संघटक श्रीमती निकिता कांबळे, लेखा तज्ञ श्रीमती स्मिता पिलणकर, सामाजिक कार्यकर्ती श्रीमती सुनिता पवार, संबधित गावातील सरपंच, ग्रामसेवक, इतर वरिष्ठ पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित असतात. तसेच कार्यक्रम करिता संस्था सचिव श्रीमती अश्विनी मोरे, संस्था संस्थापक देवेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण
प्रशिक्षण कार्यक्रमात महत्त्वाची २ प्रशिक्षण गट देण्यात आले आहेत. त्यात पाणलोट विकास जाणीव जागृती व पीक व पाणी व्यवस्थापन हे होय. या प्रशिक्षणातून मार्गदर्शक सूचना, पाणलोट समिती अध्यक्ष व सचिव यांची भूमिका, स्वयंसहायता गट, शेतकरी गट व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रकल्प अंमलबजावणी भूमिका, पाणलोट विकासाचे विविध उपचार प्रकार याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच पाणी व पीक व्यवस्थापन, उपचार क्षेत्र व पीक पद्धती, पीक व्यवस्थापनेतून पाण्याची योग्य नियोजन, गावस्तरावरील उपजीविका कार्यक्रम अंमलबजावणी, पिकांच्या पद्धती व पाणी वापर याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:19 PM 17/Nov/2025














