रत्नागिरी : कोकणातील ग्रामीण भागात शुक्रवारी देवदिवाळीचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा झाला. नरक चतुर्दशीच्या जवळपास महिनाभरानंतर येणारी देवदिवाळी ही शेतकऱ्यांची दिवाळी म्हणून खास ओळखली जाते आणि यंदाही घराघरांत त्याची लगबग पहाटेपासूनच जाणवली.
सकाळी पहिल्यांदा घरोघरी आंबोळीचे पदार्थ तयार करण्यापासून दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर गोठ्यात दिवाबत्ती, गुरांची ओवाळणी आणि त्यांना आंबोळी खाऊ घालण्याची पारंपरिक रित निभावली गेली. घरातील देवांच्या नावाने विडे भरण्याचा सोहळा मात्र दिवसातील मुख्य आकर्षण ठरला.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हा कार्यक्रम काही ठिकाणी सामुदायिक तर काही ठिकाणी वैयक्तिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. सुरुवातीला गादी तयार करून त्यावर विडे मांडले जातात आणि त्या वेळी सम्राट बळीराजाचे स्मरण करत शेतकरी ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ अशी पारंपरिक पद्धतीने आळवणी करतात. यानंतर हे विडे परस्परांना वाटून आपापल्या कुटुंबाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 22-Nov-2025










