चिपळूण : शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत अतिक्रमणे वाढली आहेत. अनेक ठिकाणी महामार्गाच्या दुतर्फा बांधलेल्या गटारावर टपऱ्या उभ्या केल्या आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने पूर्ण डोळेझाक केली असून, नगरपालिकेचे अशा अनधिकृत व्यावसायिकांना अभय आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
चिपळूण शहरात चौपदरीकरणांतर्गत बहादूरशेख चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रिटचा सर्व्हिस रोड बांधला आहे. या रोडलगतच्या गटारावर दिवसेंदिवस अनेक टपऱ्या उभ्या राहत आहेत. अनेक ठिकाणी मच्छी आणि भाजीपाला विक्रीसाठी सर्व्हिस रोडचा वापर केला जातो. त्यामुळे येथे अपघात होण्याचा धोका आहे. टेंपोमधून होणारी प्लास्टिक साहित्याची विक्री, फळ आणि कपड्यांची विक्रीसुद्धा महामार्गालगत रस्त्यावर होते. पागनाका येथे महावितरणच्या कार्यालय परिसरात चायनीजचे गाडे, भाजीपाला आणि इतर वस्तूंची विक्री सुरू आहे.
यातील काही टपऱ्या तर कायमच बंद स्थितीत दिसत आहेत; मात्र काही लोकांनी अनधिकृतपणे या जागा अडकवण्यासाठी त्या ठिकाणी टपऱ्यांची उभारणी केली आहे. शहरातील बहादूरशेख चौक ते कापसाळ विश्रामगृहादरम्यान सर्व्हिस रोडलगतच्या गटारांवर अशा टपऱ्या वाढल्या आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मध्यंतरी, या संदर्भात तक्रार झाल्यानंतर महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार होती; मात्र त्यानंतर शहरातील काही ठिकाणी महामार्गालगतची अतिक्रमणे काढण्यात आली. तरीही गटारावर ठिकठिकाणी टपऱ्या उभ्या राहताना दिसत आहेत.
महामार्गालगत असलेल्या टपऱ्या आणि किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही पालिकेला कळवले आहे. काही अनधिकृत विक्रेत्यांना आम्हीही नोटीस दिली आहे. पालिकेने कारवाई केली नाही तर आम्ही तर कारवाई करू- शाम खुणेकर, सहायक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 25/Nov/2025










