चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील कुंभार्ली घाटात ६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. घाटातील सोनपात्राजवळ असलेल्या एका वळणावर ही दुर्घटना घडली. या अपघातात रिक्षातील एक महिला प्रवासी जखमी झाली आहे, तर एसटी बसचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची फिर्याद अरुण चापू माळवदे (३६, एस.टी. बस चालक, बैंच नं. १०२२६ चिपळूण आगार) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली.
माळवदे दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या ताब्यातील (एम. एच ०९ ईएम-९१९३) क्रमांकाची चिपळूण ते पिंपरी चिंचवड जाणारी एसटी बस कुंभार्ली घाट चढत घेऊन जात होते. सोनपात्राच्या पुढील बाजूला असलेल्या एका वळणावर असताना, कराड बाजूकडून चिपळूण बाजूकडे घाट उतरणाऱ्या (एम.एच ०८/ए.क्यू/६४७४) रिक्षाने एसटी बसला जोरदार धडक दिली.
रिक्षा चालक राकेश चंद्रकांत शिंदे (४९, रा. कोळकेवाडी, चिपळूण) यांनी रस्त्याची हयगयीने आणि भरधाव वेगात रिक्षा चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रिक्षाने थेट एसटी बसच्या ड्रायव्हर बाजूकडील मागील चाकावर ठोकर दिली. या अपघातात रिक्षातील प्रवासी चंद्रकला चंद्रकांत शिंदे (रा. कोळकेवाडी, चिपळूण) या गंभीर जखमी झाल्या.
अपघातानंतर संतप्त झालेल्या संशयित पार्थ राकेश शिंदे (२०, रा. कोळकेवाडी, चिपळूण) याने रागाच्या भरात एसटी बसची पुढील काच फोडून तिचे नुकसान केले. पोलिसांनी या दोन्ही संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही संशयितांना रात्री ८:३७वाजता अटक करण्यात आली. या घटनेमुळे कुंभार्ली घाटातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 09/Dec/2025












