Mandangad : तोंडली ग्रामपंचायतीने श्रमदानातून बांधले ३७ बंधारे

मंडणगड : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तोंडली ग्रामपंचायतीने जलसंवर्धनाच्या दिशेने मोठी आणि लक्षणीय पावले उचलली. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सोमयाचा पऱ्या येथे एकाच दिवशी तब्बल २६ बंधाऱ्यांचे बांधकाम श्रमदानातून पूर्ण करण्यात आले. याआधी उमरवणेचा पऱ्या परिसरात ११ बंधारे बांधण्यात आले होते. अशाप्रकारे तोंडली ग्रामपंचायतीच्या हद्दीत आजपर्यंत एकूण ३७ बंधारे उभारण्यात आले असून जलक्रांतीचा भक्कम पाया रचला गेला आहे.

या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी सुनील खरात यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना जलसंवर्धन, जलसाक्षरता आणि सामुदायिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला सरपंच चंद्रभागा जाधव, उपसरपंच चंद्रकांत नागले, ग्रामपंचायत अधिकारी अक्षय चोपडे, तसेच तोंडली ग्रामविकास मंडळ मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामविकास कार्यात श्रमदानातून सामूहिक सहभाग नोंदवत गावाने एकजुटीची प्रेरणादायी परंपरा जपली.

या जलसंवर्धन मोहिमेत पायल घरवे, मनोहर कदम, प्रताप चिलबे, कृष्णा आंबडसकर, दिनेश तांबिटकर, प्रज्ञा फडणीस, विलास होडबे, चंद्रकांत अंबडसकर, दिलिशा कळबटे, मारुती कदम, सीताराम चिमण, रमेश चव्हाण, प्रसाद गोरीवले, राजेश अंबडसकर, कापुरचंद्र चव्हाण, अस्मिता अंबडसकर, संतोष सकपाळ, संतोषी चव्हाण, रोहिणी अंबडसकर, शाम मोरे, अनिता होडबे, विमल कदम, महादेव
सकपाळ, दत्ताराम जाधव, मंगेश होडबे, सुंदरराव सकपाळ, सीताराम जाधव, सरस्वती अंबडसकर, वर्षा अंबडसकर आणि तोंडली ग्रामविकास मंडळ तसेच सर्व ग्रामस्थ यांनी श्रमदान करीत मोलाची भूमिका बजावली.

पाणीसाठा शेतीसाठी उपयुक्त

ग्रामस्थांच्या श्रमदानातून साकारलेले हे बंधारे येत्या हंगामात पाणीसाठा वाढवून शेती, जनजीवन आणि पर्यावरणपूरक विकासाला नवी दिशा देणार आहेत. तोंडली ग्रामपंचायतीचा हा उपक्रम समृद्ध पंचायतराज अभियानाचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून गावकऱ्यांच्या सामूहिक इच्छाशक्तीचे द्योतक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 09/Dec/2025