गुहागर तालुक्यात मिशन लोकशाही यशस्वी : गटविकास अधिकारी शेखर भिलारे

आबलोली : गेले महिने विद्यार्थी शिक्षक, पालक घेत असलेली मेहनत फळाला आली असून २६ नोव्हेंबरला घेतलेल्या केंद्र स्तरावरच्या संविधानावरील परीक्षेत अंतिम २४ मुले मिळाली आहेत. या वयात एमपीएससी, युपीएससीच्या पातळीवरचे पेपर ही मुले सोडवतात आणि त्या परीक्षेत ८८,९० असे गुण मिळवतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने संविधानावरील “मिशन लोकशाही” यशस्वी झाले आहे मला वाटते, असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीचे कार्य तत्पर गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी व्यक्त केले.

याविषयी बोलताना ते म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्रात “मिशन लोकशाही” या नावाने अभिनव उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमांमध्ये “हर घर संविधान” म्हणजेच प्रत्येक घरात संविधान पोहोचवायचे होते. बऱ्याच ठिकाणी केवळ प्रस्ताविका वाचली. पण मला सांगायला अभिमान वाटतो की गुहागर तालुक्याने दोन पावले पुढे जाऊन आपल्या विद्यार्थ्यांना संविधान शिकवले. विद्यार्थ्यांची तयारी करत असताना संविधानाची ओळख पालकांनाही झाली. याबाबत पहिली परीक्षा २६ नोव्हेंबरला केंद्र स्तरावरची घेतली. त्या परीक्षेला जवळपास ३१०० विद्यार्थी बसले होते. त्यातून ८ डिसेंबरला ३४५ विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावरची परीक्षा दिली आणि अंतिम निकाल लागून आपल्याच तालुक्यातील प्रत्येक इयत्तेतील चौथी, पाचवी, सहावी, सातवीतून आपल्याला अंतिम २४ मुले सुद्धा मिळाली आहेत. त्यामुळे प्रचंड आनंद वाटतोय. तीन महिने मी, माझा शिक्षक वर्ग, माझे पालक आणि माझे विद्यार्थी यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचे चीज झाले. आज त्यांचे गुण बघितल्यानंतर समाधान वाटते की या वयात एमपीएससी, युपीएससीच्या पातळीवरचे पेपर आपली मुले सोडवतात आणि त्या परीक्षेत ८८, ९० असे गुण ती मिळवतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने संविधानावरील “मिशन लोकशाही” यशस्वी झाले आहे मला वाटते.”

“ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, पंचायत समितीच्या वतीने कौतुक सोहळा केला जाणार आहे. तसेच चौथी, पाचवीच्या निवड झालेल्या १२ मुलांना मुंबई अभ्यास दौऱ्यावर, तर सहावी, सातवीच्या १२ मुलांना दिल्ली अभ्यास दौऱ्यावर नेले जाणार आहे. २६ जानेवारीची देशाची प्रजासत्ताक दिनाची परेड त्यांना दाखवली जाणार आहे. पंचायत समिती गुहागरच्या माध्यमातून ही विशेष अभ्यास सहल नेली जाणार आहे. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांसाठीही विशेष अभ्यास दौऱ्याचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती श्र. भिलारे यांनी दिली.

नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये तालुक्यातील मुले सहभागी होत नसल्याचे निदर्शनास आले असून, हे विद्यार्थी या परीक्षांसाठी कसे तयार करता येतील यासाठीही सर्व मिळून प्रयत्न करणार असल्याचे शेखर भिलारे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 11/Dec/2025