रत्नागिरीच्या आर्यन सुर्वेचा ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन’ मध्ये झेंडा!

रत्नागिरी: रत्नागिरीचा सुपुत्र आर्यन अमोल सुर्वे याने देशपातळीवर अभिमानास्पद यश मिळवले आहे. भारत सरकारच्या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५ या प्रतिष्ठित स्पर्धेच्या ग्रैंड फायनलमध्ये आर्यनच्या नेतृत्वाखालील ‘महा वायू इनोव्हेशन्स’ संघाने अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.

देशभरातून ७२,००० हून अधिक स्पर्धक सहभागी झालेल्या या आव्हानात्मक स्पर्धेची अंतिम फेरी ८ व ९ डिसेंबर रोजी कर्नाटकातील धारवाड येथे पार पडली. पुण्याच्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आर्यनने आपल्या संघासह ३६ तास सतत कोडिंग करून नाविन्यपूर्ण सोल्यूशन सादर केले व सर्वांना मागे टाकत अव्वल ठरला. विजेत्या संघाला ७५,००० रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. आर्यनचे आजोबा विकास मलुष्टे हे रत्नागिरीत वास्तव्य करतात, यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ७२ हजार स्पर्धकांमध्ये टिकून राहून प्रथम येणे, हे आर्यनच्या चिकाटी व बुद्धिमत्तेचे द्योतक आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्हा, चिपळूण व कोकणवासियांना त्याचा अभिमान आहे. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन ही नवसंशोधन व कोडिंग क्षेत्रातील अग्रगण्य स्पर्धा असून यात यश मिळवणे, हे अत्यंत कठीण मानले जाते. रत्नागिरीच्या या होतकरू तरुणाने देशाला दिलेल्या या भेटीमुळे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 11/Dec/2025