‘आरटीई’अंतर्गत शाळा नोंदणीला २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

पुणे : राज्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील शाळा नोंदणीला २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यानुसार आरटीई संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याबाबतचे परिपत्रकही प्रसिद्ध केले आहे.

वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. प्रवेशित विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकार करत असते. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेकडे राज्यभरातील पालकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७च्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दि. ९ ते १९ जानेवारीदरम्यान शाळा नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढून राज्यातील शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.

Gadre2

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी आणि पडताळणीचे काम प्रक्रिया दिलेल्या मुदतीत १०० टक्के पूर्ण झाले नाही, ही बाब प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही. शाळा नोंदणी आणि पडताळणीसाठी २० ते २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत अखत्यारितील शाळांची नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी. – शरद गाेसावी, शिक्षण संचालक (प्राथमिक)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 20-01-2026