गुहागरमध्ये आपल्याविरोधात उमेदवारच नाही; आ. भास्कर जाधव यांना विश्वास

Jun 13, 2024 - 12:01
 0
गुहागरमध्ये आपल्याविरोधात उमेदवारच नाही; आ. भास्कर जाधव यांना विश्वास

चिपळूण : सत्तेच्या मस्तीत गेलेल्यांना जमिनीवर आणण्याची ताकद लोकशाहीत आहे. शेवटी जनताच जनार्दन आहे. जनता हीच सर्वोच्च आहे. त्यामुळे आज चारसौ पार म्हणणारी भाजपा राज्यात तडीपार झाली. असा आरोप करताना शिवसेना नेते आ. भास्कर जाधव यांनी कोकणात भाजपाला थारा नाही असे सांगून गुहागरमध्ये आपल्या विरोधात कोणताही उमेदवार समोर येणारच नाही, असा विश्वास व्यक्त केला.

चिपळुणातील बांदल हायस्कूलच्या सभागृहात बुधवारी सकाळी गुहागर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळाले म्हणून कार्यकर्त्यांचा आभार मेळावा घेण्यात आला, यावेळी आ. जाधव बोलत होते. व्यासपीठावर नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व माजी आ. संजय कदम, उपजिल्हाप्रमुख पप्पू आंग्रे, जिल्हा संघटक अरुणा आंब्रे, गुहागर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद्माकर आरेकर, सचिन बाईत, महेश नाटेकर, पप्पा चव्हाण, प्रकाश महाडिक, महेश गोवळकर, नंदकिशोर शिर्के, बळीराम शिर्के, अंकुश काते, प्रवीण ओक, संदीप कांबळे, श्री. गुजर, विश्वास दलवी, विनायक निकम, रवींद्र सुर्वे व गुहागर विधानसभा मतदारसंघातील खेड, गुहागर, चिपळूणमधील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आ. भास्कर जाधव म्हणाले, केंद्रातील राज्य फार काळ टिकणार नाही. गरज संपली की ते प्रत्येकाला फेकून देतात, याची अनेक उदाहरणे आहेत, अनेकवेळा मोदींचा फोटो लावून सेना मोदी झाली असे त्यांनी आरोप केले. मात्र, आज त्याचा प्रत्यय आला. २०१४ पर्यंत मोदी कुठे होते? मात्र, १९९८ पासून ठाकरेंचा फोटो प्रत्येक निवडणुकीमध्ये वापरण्यात आला. भाजपनेही तो वापरला. या लोकांनी धनुष्यबाण, शिवसेना पक्ष आणि ठाकरेंचा फोटो वापरला नसता तर भाजपचे चारदेखील खासदार निवडून आले नसते, अशी घणाघाती टीका आ. जाधव यांनी केली. या निवडणुकीत महाराष्ट्रात चमत्कार पडला आहे. राज्यातील ४८ खासदारांच्या निवडणुकीत प्रत्येकानेच बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला होता. पण, महाविकास आघाडीने मोदींचा फोटो लावला नव्हता. त्यामुळे हा नियतीचा न्याय आहे. ठाकरेंचा फोटो लावून शिवसेनेचे खासदार निवडून आले, असा आरोप करणाऱ्यांना नियतीने हा धडा शिकविला आहे.

गुहागर विधानसभा मतदारसंघाने या निवडणुकीत २८ हजारांचे मताधिक्य दिले आणि माझी इज्जत राखली, असे ते म्हणाले. यावेळी कार्यकत्यांच्या वतीने आ. जाधव यांची कोल्हापूर, सांगली, सातारा व पूर्व विदर्भ विभागीय नेतेपदी निवड झाल्याबद्दल तालुकाप्रमुख जितेंद्र चव्हाण यांनी आ. जाधव यांचा सत्कार केला.

मोदी सरकारने राष्ट्रपतींचा सन्मान ठेवला नाही...
देशाचा राष्ट्रपती हा सर्वोच्च असतो. या पदावर आदिवासी समाजातील एक महिला असताना देखील त्यांचा मान ठेवण्याचे काम केंद्र सरकारने केले नाही. राष्ट्रपतीपदी महिलेला न्याय दिला असे सांगताना दुसऱ्या बाजूला राम मंदिराचे उद्घाटन होताना; मात्र राष्ट्रपतींना संधी दिली नाही. नवीन संसद भवनाच्या उद्‌घाटनालादेखील राष्ट्रपतींना संधी दिली नाही. नियमाप्रमाणे संसदेचे उ‌द्घाटन राष्ट्रपतींनी केले पाहिजे. पण, पंतप्रधानांनी फोटो मात्र आपलाच निघाला पाहिजे यासाठी स्वतः उ‌द्घाटन केले. हा देश संविधानावर चालतो याचा त्यांना विसर पडला अशा स्वरूपात आ. जाधव यांनी मोदींवर देखील टीका केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 13/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow