NEET परीक्षेत कुठलाही घोटाळा झालेला नाही : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

Jun 13, 2024 - 14:46
 0
NEET परीक्षेत कुठलाही घोटाळा झालेला नाही : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG मधील पेपर लीकप्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज(दि.13) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणातील घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.

"NEET-UG मध्ये पेपर लीक झाल्याचा कोणताही पुरावा नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) अतिशय विश्वासार्ह संस्था आहे, त्यात भ्रष्टाचाराचे आरोप निराधार आहेत," असे प्रधान यांनी म्हटले.

NTA ने गुरुवारी सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाला सांगितले की, NEET UG 2024 मध्ये ग्रेस गुण मिळालेल्या 1563 उमेदवारांचे स्कोअर कार्ड रद्द केले जातील आणि त्या उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल. या उमेदवारांच्या निकालांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आल्याचेही संस्तेने कोर्टात सांगितले.

फक्त 6 परीक्षा केंद्रांवर गोंधळ: शिक्षणमंत्री
शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, 'प्रत्येक परीक्षा केंद्रावर पेपरचे दोन संच असतात आणि परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच कोणता पेपर उघडायचा आहे, हे सांगितले जाते. मात्र सहा परीक्षा केंद्रांवर दुसरा सेट उघडण्यात आल्याने 30 ते 40 मिनिटे वेळ वाया गेला. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 2018 च्या निकालानुसार एनटीएने विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिले होते. सध्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कोर्ट जो निर्णय घेईल, त्याचे आम्ही पालन करू आणि विद्यार्थ्यांचेही नुकसान होऊ देणार नाही. दोषींना योग्य शिक्षा होईल', असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

23 जून रोजी पुन्हा परीक्षा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षणमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, गुरुवारी या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने 23 जून रोजी पुन्हा परीक्षा होणार असल्याचे सांगितले आहे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, 1563 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होईल आणि त्यांचे सध्याचे गुण रद्द केले जातील. होईल.या परिक्षेचे निकाल 30 जून रोजी जाहीर होणार असून, एनटीएला पुन्हा गुणवत्ता यादी तयार करावी लागेल, ज्याच्या आधारावर 6 जुलैपासून अॅडमिशन प्रोसेस सुरू होईल.

काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी
दुसरीकडे, काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी या पेपर लीकवरुन सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सरकार या विषयापासून पळ काढत आहे. सरकार या घोटाळ्याबाबत साधी चर्चाही करत नाही. आम्ही या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करतो. ज्या एजन्सीच्या नेतृत्वाखाली हा घोटाळा झाला, त्यांनाच तपासाची जबाबदारी देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे 5 मे रोजी NEET-UG परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून घोटाळा झाल्याचा आरोप होत आहेत. अनेक उमेदवारांनी परीक्षेत 720 पैकी 720 गुण मिळविल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांची केंद्रही एकाच ठिकाणी होती. परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, तरच सर्वांना न्याय मिळू शकेल, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. याप्रकरणी परीक्षेच्या कामकाजात अनियमितता झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकाही विविध न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 13-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow