रत्नागिरी : गणपतीपुळे किनाऱ्यावरील स्टॉलधारकांना नोटीस

May 27, 2024 - 11:44
May 27, 2024 - 11:50
 0
रत्नागिरी :  गणपतीपुळे किनाऱ्यावरील स्टॉलधारकांना नोटीस

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या भूमापन क्र. २ मध्ये असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनारीवरील मोरया चौक तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी स्टॉलही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा स्वरूपाची जाहीर नोटीस गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून काढण्यात आली असून, ती स्टॉलधारकांना देण्यात आली आहे.

या जाहीर नोटिशीमध्ये गणपतीपुळे ग्रामपंचायतीने म्हटले आहे की, गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या सर्वे नंबर २ मध्ये समुद्रकिनारी, मोरया चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी असलेले स्टॉलधारक व हातगाडी व्यावसायिकांना आपले व्यवसाय चालू ठेवण्याची मुदत ३१ मेपर्यंत आहे. त्यामुळे हे सर्व स्टॉलधारकांनी आपले स्टॉल दि. ३१ मे पासून बंद करावे, असे आदेश देण्यात आहेत. तसेच तसेच दि. ३१ मे रोजी सर्व स्टॉलधारक व हातगाडी व्यावसायिकांनी आपले स्टॉल बंद करून ३१ पासून ग्रामपंचायतीला सहकार्य करावयाचे आहे. तसेच आपली जागा मोकळी करावयाची आहे, असे स्टॉलधारकांना कळविण्यात आले आहे. त्यानंतर जे हातगाडी व्यावसायिक व स्टॉल धारक आपले स्टॉल चालू ठेवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ग्रामपंचायतीने आपल्या जाहीर नोटीसमध्ये म्हटले आहे.

गतवर्षी गणपतीपुळे समुद्रकिनारी मे महिन्याच्या अखेरीस गणपतीपुळे समुद्राला मोठे उधाण आल्याने मोठ्या लाटांचा मारा समुद्रकिनाऱ्यापर्यंत धडकला होता. या मोठ्या लाटांच्या तडाख्यात गणपतीपुळे किनाऱ्यावरील स्टॉलधारकांचे हातगाडी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गतवर्षी या नुकसानग्रस्त स्टॉलधारकांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात आली. याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संबंधित स्टॉलधारकांना आपल्या सामंत कुटुंबीयांतर्फे वैयक्तिकरीत्या मदत केली होती. त्यामुळे गतवर्षीची प्रचिती यंदाच्या पावसाळ्यात येऊ नये तसेच कुठलाही मोठा धोका उद्भवू नये, याकरिता गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या स्थानिक विक्रेत्यांना आगाऊ जाहीर नोटीस दिली असल्याचे बोलले जात आहे. तसेच सध्या गणपतीपुळे समुद्राची पाण्याची पातळी वाढू लागली असून यंदाही मोठ्या लाटा निर्माण होणार तर नाही ना, अशी भिती स्थानिक व्यावसायिकांमध्ये लागून राहिली आहे.

दरम्यान, गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांचे खास आकर्षण असलेले वॉटर स्पोर्ट व्यवसाय संबंधित व्यावसायिकांनी शनिवारपासून बंद केले आहेत. दरवर्षी गणपतीपुळे येथील मोरया वॉटर स्पोर्ट अँड बीच असोसिएशनच्या माध्यमातून गणपतीपुळे समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट व्यवसाय योग्य प्रकारे केला जातो. या कालावधीत समुद्रात बुडणाऱ्या व्यावसायिकांचे प्राणही वाचवले जातात. मात्र, या व्यावसायिकांना दरवर्षी २५ मेपर्यंत व्यवसाय चालू ठेवण्याची मुदत असते. एकूणच या मुदतीच्या आदेशाचे पालन करीत मोरया वॉटर स्पोर्टच्या वतीने आपले वॉटर स्पोर्ट व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. एकूणच वॉटर स्पोर्ट व्यवसाय बंद झाले असले तरी गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी अद्याप दिसून येत आहे. त्यामुळे आता पर्यटकांना वॉटर स्पोर्ट अनुभवण्याची उत्सुकता लागून राहणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर


04:59 PM 25/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow