संगमेश्वर : सरंद येथील रस्त्याच्या अर्धवट कामाचा वाहनचालकांना नाहक त्रास

Jun 29, 2024 - 11:08
Jun 29, 2024 - 17:12
 0
संगमेश्वर : सरंद येथील रस्त्याच्या अर्धवट कामाचा वाहनचालकांना नाहक त्रास

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आरवली माखजन रस्त्यावर सरंद गोटेकरवाडी व माखजन इंग्लिश स्कूल जवळ रस्त्याची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. मे महिन्याच्या शेवटी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली व अद्याप हे काम अपूर्ण असल्याने याचा त्रास वाहनचालकांसह पादचाऱ्यांना होत आहे.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्याची उंची वाढवण्याचे काम उशिराने सुरू झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या अर्ध्या भागाची उंची सुमारे २.५ फूट वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मुळात अरुंद असलेल्या रस्त्याचे विभाजन दोन भागांत झाल्याने येथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना मोठी अडचण होत आहे.

उंची वाढवलेल्या रस्त्यावरून मोठी वाहने जाऊ शकत नसल्याने अर्ध्या भागातूनच साऱ्या वाहनाना ये जा करावी लागते आहे. या रस्त्याचा साईडपट्टीचा भाग खचला आहे. अर्ध्याच रस्त्याचा वापर होत असल्याने या ठिकाणी वाहनाना थांबून राहावे लागत आहे. या रस्त्यावर करण्यात आलेले काम म्हणजे आगीतून फोफाट्यात गेल्यासारखं असल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांमधून उमटत आहे. या रस्त्याचे अपूर्ण काम असल्याने रात्रीच्या वेळी येथे येणाऱ्या वाहनचालकांना चाचपडायला होत आहे. दुचाकीस्वार या ठिकाणी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:37 PM 29/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow