छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला 'मनसे'कडून जोरदार प्रत्युत्तर

Jun 15, 2024 - 16:19
 0
छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला 'मनसे'कडून जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्ष आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

तुमचे रक्ताचे नाते आहे. माझे आणि बाळासाहेबांचे तर मतभेद झाले. पण राज ठाकरेंचे काय? तुमचे मतभेद कशावरुन झाले? मतभेद झाले तरीही तुम्ही हे लक्षात घ्यायचे होते की, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. मग तुम्ही वेगळे व्हायचे कारण काय? तुमची काय मागणी होती, ते लोकांना सांगा. राज ठाकरेंनी मनसे पक्ष काढला. शिवसेना सोडून त्यांनी चूक केली, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली होती. या टीकेचा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

भुजबळांचे वैफल्यग्रस्त, दिल्लीत जायची संधी हुकल्याने राज ठाकरेंवर बोलले

शिवसेनेत कधीही जात पाहिली जात नव्हती. मंडल आयोगाचा विषय पुढे करण्याचे कोणतेही कारण नव्हते. भुजबळ वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांची सद्सदविवेकबुद्धी हरवली आहे. लोकसभेला शब्द देऊनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही आता राज्यसभाही गेली. प्रचंड माया जमवल्यामुळे त्याच्या केसेस सुरू आहेत. त्यामुळे ते आता राज ठाकरे यांच्यावर बोलले, या शब्दांत प्रकाश महाजन यांनी हल्लाबोल केला.

छगन भुजबळांचे नॉलेज कमी आहे

छगन भुजबळ कोणत्या संदर्भात बोलले हे समजले नाही. भुजबळांनी या विषयावर बोलण्याचे कारण काय? भुजबळांनी नाशिकमध्ये मोठी नॉलेज सिटी काढली, पण त्यांचे नॉलेज कमी आहे. १९९३ साली १७ ते १८ आमदार घेऊन भुजबळ पहिल्यांदा बाहेर पडले. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम भुजबळांनीच पहिल्यांदा केले. बाळासाहेबांना टी. बाळू बोलण्याची सुरुवात भुजबळांनी केली. बाळासाहेबांचे वय न पाहता त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. कोणत्या तोंडाने भुजबळ राज ठाकरेंवर आरोप करत आहेत? अशी विचारणा प्रकाश महाजन यांनी केली.

दरम्यान, राज ठाकरे यांनी कधीही पक्ष फोडायचे काम केले नाही. त्यांचे काही तात्विक आणि अंतर्गत मतभेद झाले. बाळासाहेबांना हे मतभेद सांगून त्यांचा आशीर्वाद घेऊन राज ठाकरे बाहेर पडले. कुणालाही बाहेर पडून नवा पक्ष काढण्याचे स्वातंत्र्य आहे. पण भुजबळांना आता विषय काढण्याचे कारण काय होते? भुजबळांनी आता तरी खरे बोलावे. दिवंगत नेते मनोहर जोशींना मुख्यंमत्री केले, ही भुजबळांची खरी पोटदुखी होती, असा मोठा दावा प्रकाश महाजन यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 15-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow