दापोलीतील ३३ केव्हीच्या वीज वाहिनीत वारंवार बिघाड ; विजेचा खेळखंडोबा

May 27, 2024 - 13:46
 0
दापोलीतील ३३ केव्हीच्या वीज वाहिनीत वारंवार बिघाड ; विजेचा खेळखंडोबा

दापोली : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून महावितरण कंपनीच्या विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. पाऊस असो अथवा नसो कायम बत्ती गुल असते. मान्सून आधीच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाली आहेत. त्यात अधिकाऱ्यांचे फोन बंद आहेत, त्यामुळे महावितरण कंपनी अधिकाऱ्यांबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

२३ मे रोजी रात्री दस्तुरी येथून ३३ केव्ही वीज वाहिनीत बिघाड झाला. त्यामुळे लोकांना रात्र अंधारात आणि प्रचंड उकाड्यात जागून काढाली लागली. गावतळे परिसर आणि आजूबाजूच्या गावात महावितरणचे हे दुखणे रोजचे झाले असून आता नागरिक महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.

वाकवलीपासून गावतळे आणि आजूबाजूच्या परिसरात लहान-मोठे दुकान व्यावसायिक आहेत. दुकानात दूध, आईस्क्रीम, कुल्फी असे दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवतात, मात्र वीज वारंवार जात असल्याने हे दुग्धजन्य पदार्थ खराब होत असल्याने दुकान व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आमच्या नुकसानीची भरपाई कोण करणार? असा सवाल व्यावसायिकांमधून विचारला जात आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने पिण्याच्या पाण्याची देखील गैरसोय होत आहे. महावितरण विभागाकडून नागरिकांची समस्या लक्षात घेत नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवण्याची मागणी होत आहे.

अद्याप पावसाळा सुरू झाला नाही त्या आधीच विद्युत पुरवठा खंडित होत आहे. रोज विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अजून किती नुकसान सहन करायचे, याचा जाब आता महावितरण अधिका-यांना विचारण्याची वेळ आली आहे. - रुपेश ऊर्फ भाई पवार


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 27/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow