वटपौर्णिमेपासून अतिजोरदार पावसाचा इशारा

Jun 20, 2024 - 10:20
 0
वटपौर्णिमेपासून अतिजोरदार पावसाचा इशारा

◼️ कोकणातील सर्व जिल्ह्यांत अलर्ट

रत्नागिरी : गेले दोन दिवस ओसरलेल्या पावसाचा जोर बुधवारपासून वाढण्यास सुरुवात झाली असून, कोकण किनारपट्टी भागातील सर्व जिल्ह्यांत जोरदार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. 

बुधवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, मंगळारी सकाळी साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठ या संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात २० मि. मी. च्या सरासरीने एकूण पावणे दोनशे मि.मी. पाऊस झाला. ओसरलेला पाऊस बुधवारपासून सक्रिय झाला असून, वटपौर्णिमेपासून कोकणात अतितीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारपासून हवेचे दाब कमी झाल्यानंतर किनारपट्टीतील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे. काही भागात जोराचा पाऊस, काही भागांत अतिवृष्टी अशीही परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या आठवड्यात दि. १९ ते २२ जूनपर्यंत चांगल्या पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. त्यामुळे अरबी सागरातील मोसमी पावसाची शाखा सक्रिय होईल. त्या शिवाय बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर १००० ते १००२ हेप्टा पास्कल इतका कमी हवेचा आठवडाभर राहील. त्यामुळे तेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात सर्व ढग जमा होऊन बंगाल उपसागरातील शाखाही सक्रिय होण्याचा अंदाज आहे. 

आगामी काळात मोसमी पाऊस सक्रीय होण्यासाठी अनुकुलता प्राप्त होणार आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आगामी काळात जोरदार पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ९ ते १० कि.मी., तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ताशी १७ किमी राहणार आहे. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहिल. पालघर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहिल. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ६७ टक्के राहणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने तीनशे मि.मी. ची सरासरी गाठली असून अडीच हजाराची एकूण मजल मारली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 20-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow