जगबुडी नदीतील गाळउपसा कामाला प्रारंभ

May 27, 2024 - 16:21
 0
जगबुडी नदीतील गाळउपसा कामाला प्रारंभ

खेड : तालुक्यातील जगबुडी व नारिंगी नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी खेड बाजारपेठेत घुसून व्यापाऱ्यांचे नुकसान तर नदी किनाऱ्यावरील शेतीचे नुकसान होत असते. या प्रश्री आमदार योगेश कदम यांनी गंभीरपणे लक्ष घालत केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर गाळ उपसण्याचे बेटे काढण्यासाठी २ कोटी ८४ लाख रूपयांच्या निधीला मान्यता मिळवली. गाळ उपासण्याचे आदेश पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी अलारे येथील कार्यालयाला दिल्या नंतर शुक्रवारी दि. २४ रोजी या कामाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी खेड बाजारपेठेतील व्यापारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

जगबुडी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू झाल्याने खेडवासियांना पुराच्या पाण्यातून मुक्ती मिळणार असून जगबुडी नदीपात्रही मोकळा श्वास घेणार आहे. शहरातील जगबुडी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यात मुसळधार अतिवृष्टी झाल्यानंतर पुराचे पाणी बाजारपेठेत घुसून व्यापाऱ्यांची अपरिमित हानी होत असते काही वर्षांपूर्वी जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यात आला होता. मात्र नदीपात्रात पुन्हा गाळ साचल्याने पुराच्या धोक्याची टांगती तलवार आजमितीसही कायम आहे. जगबुडीसह नारिंगी नदीपात्रात ही गाळ साचला आहे. या प्रश्नी व्यापाऱ्यांनी सातत्याने आमदार योगेश कदम यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार योगेशकदम यांनी व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडत गाळ उपसण्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी साकडे घातले होते. त्यानुसार जगबुडीसह नारंगी नदीतील गाळ उपसण्यासाठी २ कोटी ८४ लाख ९७२ रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये केवळ शहरातील मटण मच्छी मार्केट येथील नदीपात्राबरोबरच भरणे येथील जगबुडी नदीपासून नारिंगी नदीपर्यंत व नारिंगी नदीपासून पुढे योगिता दंत महाविद्यालयापर्यंतच्या ३ कि.मी. चा ही गाळ उपसण्यात येणार आहे. अलोरेतील जलसंपदा विभागामार्फत हे काम होत आहे.

पाटबंधारे विभागामार्फत नदीतील गाळ व बेटे काढण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी अलोरे येथील कार्यालयाला तातडीने काम सुरू करून गाळ उपासण्याबाबत सूचित केले आहे, पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील गाळ उपसून बेटेही काढण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शहरवासियांसह व्यापाऱ्यांवरील पुराच्या पाण्याची टांगती तलवार दूर होणार आहे.  

व्यापाऱ्यांना मिळणार दिलासा !
अतिवृष्टीदरम्यान जगबुडीच्या पुराचे पाणी बाजारपेठेसह आजूबाजूच्या परिसरात घुसल्यास मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. विशेषतः व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासाठी निधीची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवत सतत पाठपुरावाही केला. यासाठी २ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीस मान्यता मिळाली असून पावसाळ्यापूर्वीच गाळ उपसण्यात येणार आहे. यामुळे शहरवासीयांसह व्यापाऱ्याऱ्यांची पुराच्या पाण्यातून सुटका होऊन दिलासा मिळणार आहे, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:48 PM 27/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow